Sangli Samachar

The Janshakti News

झाडाची वाळलेली पाने अन् मी... (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २५ सप्टेंबर २०२४
घरातील हॉलचा दरवाजा व खिडक्या मी उघडल्या आणि हॉलमधील सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचू लागलो. थोड्या वेळाने माझे वर्तमानपत्राचे वाचन संपले आणि माझ्या खोलीकडे जाण्यासाठी मी उठलो असतांना हॉलमधील फरशीवर झाडाची दोन-तीन वाळलेली पाने पडलेली मला आढळली. 
घरामध्ये कशाला हा कचरा हवा? ती वाळलेली पाने कचऱ्याच्या टोपलीत टाकावीत या उद्देशाने खाली वाकून त्यांना मी उचलणार इतक्यात माझ्या कानांवर कांही शब्द ऐकु आले, 

“अहो, कृपा करून आमची एक विनंती ऐकता कां?” 

आवाज कुठून आला हे जाणण्यासाठी मी इकडे-तिकडे निरखून पाहु लागलो. तेव्हा ते शब्द झाडाच्या वाळलेल्या पानातून येत असल्याचे मला समजले. 


त्या वाळलेल्या पानातून पुन्हा शब्द ऐकु आले,
”तुम्हाला आमची एक विनंती आहे. कृपाकरून ऐका. आम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकू नका. आम्हाला ठाऊक आहे. वयोमानाप्रमाणे आमचे शरीर सुरकुत्यांनी भरले आहे, सगळी गात्रे ठकलेली आहेत, आमच्यातील जीवनरस आटला आहे. या दैन्यावस्थेतेतील शुष्क झालेल्या आम्हा पानांचा तुम्हा मनुष्यांना कांही उपयोग नाही, हे खरे आहे. पण आम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकू नका. त्या ऐवजी तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये ज्या कुंड्या आहेत ना त्यांच्यामध्ये आम्हाला टाका. 
आमच्या शरीरामध्ये जो कांही थोडा जीवनरस व कांही भाग बाकी राहिला आहे त्यांचा कुंड्यामध्ये असलेल्या जीवजंतूना खाद्य म्हणून उपयोग होईल. त्या नंतर आमचे जे कांही उरेल त्याचाही कुंड्यातील झाडांना खत म्हणून उपयोग होईल. अशा रितीने आमचा हा देह त्याच्या अंतापर्यंत पूर्ण नष्ट झाल्यावर मातीमध्ये, म्हणजे जिथून आम्ही आलो तिथे मिसळला जाईल. आणि, आमच्या जीवनाचे सार्थक होईल.” 

त्या वाळलेल्या पानांच्या शब्दांनी मला विचार करायला भाग पाडले. मनोमन थोडावेळ मी कांही विचार केला व त्या पानांना म्हणालो, ”कांही वेळापुर्वी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकावे असा विचार मी केला होता पण आता मी माझा विचार बदलला आहे. तुमच्या सांगण्याप्रमाणे मी तुम्हाला झाडांच्या कुंड्यामध्ये नेऊन ठेवतो.” 

मी त्या वाळलेल्या पानांना बाल्कनीत ठेवलेल्या झाडांच्या कुंड्यातील मातीवर अलगद ठेवले व वाऱ्याने ती पुन्हा उडुन जाऊ नयेत यासाठी त्यांच्यावर वजन म्हणून कुंडीतील थोडी माती लोटली. माझ्या कानांवर त्या वाळलेल्या पानांचे शब्द ऐकु आले, 

”धन्यवाद, आम्ही सर्वजण तुमचे आभारी आहोत.” 

मी प्रत्युतर दिले नाही व पाठ वळवून चालू लागलो. चालता चालता माझ्या मनात विचार आलाः खरं तर मला एका मनुष्याला, या वाळलेल्या पानांचे आभार मानले पाहिजेत. 
हे शुष्क पर्णांनो आज तुमच्या उदाहरणातून शब्दांमध्ये बांधता न येणारे जीवनाचे खूप महत्वाचे तत्त्व मला समजले. 
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.” 
आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण