| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ सप्टेंबर २०२४
लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच निवडणूक लढवण्याचा, तसेच राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मी व आमच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील अशा दोघांनीही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी जी भूमिका मांडली आहे त्याबाबत मी कोणतेही जाहीर वक्तव्य करणार नाही. पक्ष नेतृत्वाने मला कोणतेही, कोणाबद्दलही वादग्रस्त वक्तव्य करू नये अशा सूचना दिल्या आहेत. त्याहीपेक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील या माझ्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत, स्व. मदन भाऊ पाटील आणि माझे लहानपणापासूनचे संबंध आहेत. एकत्र खेळलो वाढलो आहोत. या सर्वांचे जाणीव मला आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
सध्या महाआघाडीला जनतेतून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे पाहून विरोधकांकडून विशेषतः भाजपकडून भांडणे लावण्याचे उद्योग सुरू आहेत. मला त्यात पडायचे नाही. परंतु काँग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगून पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले की, "तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं !" की टॅगलाईन घेऊन मी जनतेच्या दरबारात जाणार आहे. मतदार संघातील प्रत्येक भागातील अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधत, त्यांचे म्हणणे जाणून घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडवण्यासाठी आग्रह हक्काने माझा प्रयत्न राहील.
1990 मधील काँग्रेस वैद्यकीय सेलचे अध्यक्षपद ते सध्याच्या सांगली शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सातत्याने जनतेच्या सेवेत कार्यरत राहिलो. माझ्या कार्याची दखल घेऊन मला महाआघाडीमार्फत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली. परंतु अगदी शेवटच्या टप्प्यात याबाबत निर्णय झाल्याने मला प्रचारासाठी खूपच कमी अवधी मिळाला. तरीही 85000 मते मिळवली. परंतु मला अगदी थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी माझ्या बाबत अपप्रचार केला गेला. मात्र त्याकडे लक्ष न देता गेली पाच वर्षे मी प्रामाणिकपणे पक्ष कार्याच्या माध्यमातून जनसेवेत रुजू आहे. 2019 चे 2024 या गेल्या पाच वर्षातही मी अनेक आंदोलने, मोर्चा अगदी वैयक्तिक पातळीवर ही जनतेच्या अनेक समस्यासाठी महापालिकेपासून ते मंत्रालयापर्यंत झटून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. असे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सांगितले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. माझ्यावर पक्षश्रेष्ठींचा, आणि पक्षश्रेष्ठीवर माझा विश्वास आहे. त्यामुळे ते देतील तो निर्णय मला मान्य असेल, पक्ष सेवा आणि जनसेवा ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. याबाबत मला अधिक काही बोलायचे नाही. परंतु 2024 च्या निवडणुकीत महाआघाडीचाच उमेदवार विधानसभेत जाईल असा विश्वास पृथ्वीराजबाबा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यावर टीका करताना पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले की, सांगली विधानसभा मतदारसंघासाठी गेल्या पाच वर्षात आपण कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्याचे ते सांगत आहेत. या पाच वर्षातील पहिली अडीच वर्षे महाआघाडीचे सत्ता होती. आणि आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आणलेल्या कोट्यावधी रुपये निधीवर त्यांनी हक्क सांगितला आहे. केवळ पूल आणि रस्ते म्हणजे मतदार संघाचा विकास नव्हे, असे सांगून पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले की, वर्षात सुधीर दादांनी विधानसभेत किती प्रश्न विचारले, त्याबाबत काय पाठपुरावा केला ? हेही जाहीर करावे. सध्या सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न सांगलीकरांना पडला आहे. हीच परिस्थिती सांगली विधानसभा मतदारसंघात आहे. मतदारांच्या अनेक समस्या आहेत, ज्या विद्यमान आमदारांना सोडवता आल्या नाहीत, अशी टीकाही पृथ्वीराज बाबा पाटील यांनी यावेळी केली.