yuva MAharashtra छंद फोटोग्राफीचा आनंद साठविण्याचा - (✒️ राजा सांगलीकर)

छंद फोटोग्राफीचा आनंद साठविण्याचा - (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १८ सप्टेंबर २०२४
आजचे जीवन खूप धावपळीचे, धकाधकीचे, स्पर्धेचे, संगणक, इंटरनेट, आर्टिफिशल इंटीलजन्सचे. एकत्र कुटुंब पद्धती कधीच लयाला गेली आहे. छोटे कुटुंब, दार बंद फ्लॅट-घरे, मी, माझे, आत्मकेंद्रीतची संस्कृती उदयास आली आहे. टीव्ही, इंटरनेट, यूट्यब वर त्याच त्याच रटाळ, कंटाळवाण्या सिरीयल, टीआरपी वाढविण्यासाठी वारंवार दाखविली जाणारी एकच-एक बातमी, चर्चा, व्हिडीओ क्लिप्स, हाणामारीने भरलेले सिनेमांची चलती, यातून ना मनोरंजन, ना ज्ञानग्रहण, बस्स फक्त वेळेचा अपव्यय इतकेच. भरीस भर ही महामारी. 
पण नोकरी-व्यवसायातून निवृत्त झालेल्या वृद्धांची समस्या वेगळीच. त्यांच्याकडे खुपसा वेळ मोकळा. खायला उठणाऱ्या या मोकळ्या वेळेचे काय करायचे, कसा घालवायचा? 
दिवस कधी उगवला, कधी संपला हे जरी समजत नसले तरी आला दिवस पार पडला ना हुश्श .... मानसाचा यंत्रमानव बनत चालला आहे कां ? 

मनात घोंघवणारे नकारार्थी विचार आणि उदासीनता, अस्वस्थता, बेचैनी म्हणजेच कां आजचे मानवी जीवन ?   
या आणि अशा सर्व प्रश्नांचे एकच उत्तर - बिल्कुल नाही ! 

सद्यस्थितीतील आजच्या जीवनाचा आपण आनंदही घेऊ शकतो आणि आनंदाच्या त्या क्षणांची साठवणही करू शकतो. कसे? 
फोटोग्राफी करून, फोटोग्राफीचा छंद जोपासून. 

फोटो काढण्यासाठी सर्वांकडे भारी किंमतीचा डीएसएलआर कॅमेरा नसला तरी आजच्या काळात कांही बिघडत नाही. जवळ कॅमेरा असलेला मोबाईल तर आहे. मग बस्स. आनंदाचा प्रसंग, घटना, क्षण जाणवला की मोबाईल ऑन करा आणि कॅमेरा क्लिक करा. त्या आनंदाच्या प्रसंगाची, घटनेची, क्षणाची कायमस्वरूपी साठवण झालीच म्हणून समजा. अगदी सोपे आहे हे. नंतर आवश्यकतेप्रमाणे हे फोटो पाहायचे, सोशल मिडीयावर प्रसिद्ध करायचे, स्वतः आनंदी व्हायचे आणि इतरांना आनंदी करायचे. 


फोटोग्राफीचा छंद जोपासण्याचे आठवणींची साठवण करण्यासोबत आणखीही कांही फायदे आहेत, उदाहरणार्थः 
१. फोटोग्राफीचा छंद जोपासण्याचा सर्वात मोठा फायदा व्यवसाय, नोकरीतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठांना त्यांना जाणवत असलेला एकटेपणा कमी करण्यात होतो. शिवाय घर बसल्या सोशल मिडीयावर फोटो प्रसिद्ध करून नवीन मित्र जोडता येतात. 
२. फोटोग्राफी फोटोग्राफरला निसर्गाच्या अधिक जवळ नेते. सूर्योदय, सूर्यास्त, आकाश, तलावातील पाण्यावर उठणाऱ्या लहरी, मुक्तपणे स्वच्छंद करणारे पक्षी, फुलपांखरे, अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या जवळ असूनही आपण त्यांच्याकडे पाहात नाही, फोटोग्राफी आपल्याला त्यांना पाहायला शिकवते, आपल्या मनाच्या जाणीवा रूंदावुन क्लेश, मनःस्ताप, नैराश्यातून मुक्त करते.  
३. प्रिय, आदरणीय व्यक्तींच्या सोबत घालवलेले सुखद क्षण फोटोग्राफ, आपल्या स्मृतीमध्ये अमर बनतात.
४. बालपणाचे, विद्यार्थी दशेतील फोटो, नोकरी, लग्न समारंभातील फोटो आपला जीवनाचा प्रवास कसा होत गेला हे दर्शवितात. 
५. फोटोग्राफ कल्पनाशक्तीला प्रेरणा देतात, विचार बदलू शकतात, शिक्षित करू शकतात. फोटोतून लेखक, कवींना नवनवीन कल्पना, विचार सुचतात. 
६. फोटोग्राफी अध्यात्मिक विकासासाठीसुद्धा उपयोगी होते. आकाश, समुद्र, जंगले, द-या खोरी, विविध प्राणी, पशू, किटक, तारे, चांदण्या फोटोग्राफी करताना हे सर्व पाहात निसर्गाच्या असीमतेची, भव्यतेची, मोठेपणाची आणि आपण किती लहान आहात याची जाणीव होऊन अहंकार, आत्मकेंद्रीतपणा, दंभ, गर्व अशा कुप्रवृत्ती कमी होतात. 
७. माणूस भावनाप्रधान आहे. दैनंदिन जीवनातील आनंदाच्या, दुःखाच्या घटना, प्रसंग माणसातील माणूसपण, चांगल्या, वाईट भावना प्रदर्शित करत असतात. फोटोग्राफ्स या भावनांची नोंद घेतात, प्रसंगानुरूप त्यांची आठवण करून देऊन अनुभवलेल्या घटनांवर, प्रसंगावर, मनामध्ये त्या क्षणांना उमटलेल्या प्रतिक्रियांवर पुनरपी विचार करण्यास भाग पाडतात आणि विचार शुद्धीकरणाने जीवनमान उंचावण्यास मदत करतात. 
८. एक चित्र हजार शब्दांचे वर्णन करते अशी म्हण आहे. गुंतागुंतीचे, क्लिष्ट विचार एका फोटोमधून प्रभावीपणे व्यक्त केले जाऊ शकतात. 
९. मानवी मन वढाळ आहे, नाठाळ आहे, परत-परत नकारार्थी विचार, असमाधान, अशांती, बेचैनीकडे वळते आणि दुःखी होत असते. अशा वढाळ, नाठाला मनाला आनंदाच्या प्रसंगाची, क्षणांची आठवण करून द्यायची आणि फिरून एकवेळ त्याला आनंदी बनवायचे.

हे सर्व सांगण्याचा एकच उद्देश आहे. मानवी जीवनाला मर्यादा आहे तेव्हा मिळालेला अमूल्य वेळ निरर्थक गोष्टीत, कार्यात व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा फोटोग्राफीसारखा छंद जोपासण्यात केला, तर जीवनाची वाटचाल आनंदी होण्यात मदत होईल हे नक्की. 
तर वाचकहो, आनंदाच्या साठवणीचे कांही फोटो आज पाहा आणि आजचा दिवस आनंदात साजरा करा. 
आजचा लेखन प्रपंच इथे पूर्ण.