| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विशेषतः महाआघाडीत एकसंघतेचे ढोल बडवले जात असतानाच, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून घेतलेली भूमिका महाआघाडीस धोक्याची ठरू शकते. कडेगाव येथील नुकत्याच झालेल्या कडेगाव येथील कार्यक्रमास उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्यामागे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.
मा. शरद पवार यांनी ठाकरे यांना स्पष्ट शब्दात आगामी निवडणूक चेहऱ्याविनाच लढविले जाईल असे सांगितले आहे. काँग्रेसनेही त्यांचे 'री' ओढली असून, विधानसभा निवडणुकीसाठी चेहरा ठरवण्याची मागणी घेऊन दिल्ली दरबारातूनही पोहोचलेल्या ठाकरे यांना विन्मुख परतावे लागले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे स्वप्ने पाहणाऱ्या ठाकरे गटाला हा जोरदार धक्का बसला आहे.
या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाआघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोनच पक्ष बलाढ्य असून, इतर पक्षांना त्यांच्या मागे जावे लागते. परिणामी उद्धव ठाकरे यांची महाआघाडीत कुचंबणा होत आहे. ही खदखद कडेगाव येथील स्व. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या लोकतीर्थ स्मारक व पुतळा अनावरण प्रसंगी अनुपस्थित राहून दिसून आले आहे.
त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जाते ? आणि ठाकरे यांची भूमिका काय राहते ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. जर यदाकदाचित ठाकरे महाआघाडीतून बाहेर पडले, तर ते स्वतंत्र लढणार की तिसऱ्या आघाडीत सामील होणार याबाबतही चर्चा होत आहे. सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती महाआघाडीला जोरदार टक्कर देण्यासाठी तिसरी आघाडी जोर धरत आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर ही मंडळी महाआघाडी आणि महायुतीतील दिग्गज नाराजांना आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जर तिसरी आघाडी अस्तित्वात आली, तर ठाकरे यांच्याप्रमाणेच महायुती व महाआघाडीतील कोण कोणते नेते कोलांट्या उड्या घेतात हे पाहणे अवस्थेचे ठरणार आहे.