Sangli Samachar

The Janshakti News

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी अखेर कल्याणकारी मंडळाची स्थापना, सांगली जिल्ह्यातील रिक्षा टॅक्सी चालकांकडून आनंद व्यक्त !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ सप्टेंबर २०२४
गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेकडून कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या महामंडळामुळे इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे रिक्षा चालकांनाही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. परंतु केवळ आश्वासनापलीकडे आजपर्यंत याबाबतीत ठोस पाऊल उचलले गेले नव्हते. मात्र शिंदे सरकारने याबाबत 16 मार्च 2024 रोजी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आज त्याला मूर्त स्वरूप येऊन अखेर 'धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर चालक कल्याणकारी मंडळ' स्थापन करण्यात आले.

या महामंडळामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, रिक्षा किंवा कार चालवत असताना दुखापत झाल्यास पन्नास हजारापर्यंत अर्थसहाय्य, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, ६५ वर्षांवरील परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान, आधी योजनांचा लाभ मिळणार आहे.


कल्याणकारी मंडळाची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून त्याची रचना शासन निर्णयानुसार करण्यात येईल. या महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबईत तर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळाकडे वार्षिक वर्गणी, शासकीय अनुदान, नोंदणी शुल्क आणि इतर मार्गाने निधी संकलित करण्यात येणार असून योजनेचा लाभ घेण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांना अर्ज करावा लागणार आहे. ऑटो रिक्षा परवानाधारक आणि त्याची चालक यांची नोंदणी जिल्हा आरटीओ कार्यालयामार्फत करण्यात येऊन, त्यानंतर मंजूर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक यांना नोंदणी ओळखपत्र दिले जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी पाचशे रुपये सभासद नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानंतर 300 रुपये वार्षिक सभासद शुल्क आकारण्यात येईल.

सांगली जिल्ह्यात आठ हजार रिक्षा चालक व 2800 टॅक्सी चालकांची नोंदणी आरटीओकडे आहे. या सर्वांना आरटीओ मार्फत महामंडळासाठी नव्याने नोंदणी करण्यात येणार आहे. साहजिकच या सर्वांना या महामंडळाचा लाभ मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.