Sangli Samachar

The Janshakti News

समाजाच्या माणसाला राजकीय ताकद देण्याची गरज, राज्यस्तरीय चिंतन परिषदेमध्ये माजी गृहराज्यमंत्री, रमेश दादा बागवे यांचे प्रतिपादन


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ सप्टेंबर २०२४
सर्वच राजकीय पक्षांनी मातंग समाजाचा फक्त मतांपुरता वापर केला असा संतप्त सूर मातंग समाजाच्या राज्यस्तरीय चिंतन परिषदेत उमटला. 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त; साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, सांगली जिल्ह्याच्या वतीने, एकूण तीन चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिली राज्यस्तरीय चिंतन परिषद सांगली येथे पार पडली. सुरवातीला, माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून परिषदेचे उदघाटन केले.  

'महाराष्ट्राच्या राजकारणात मातंग समाजाची भूमिका - काल आज उद्या' या विषयावर महाराष्ट्रातील अनेक मातब्बर विचारवंत यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे म्हणाले की, राजकारणासाठी अनेक गोष्टींचे ज्ञान कौशल्य आवश्यक असते आणि त्या दृष्टिकोनातून मातंग समाजाने परिपूर्ण, परिपक्व होण्याची आवश्यकता आहे.


परिषदेचे मार्गदर्शक राम कांबळे म्हणाले की, या चिंतन परिषदेमध्ये चिंतन करत असताना ते स्वतःपासून करणे आवश्यक आहे.  

बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक शिवाजीराव आवळे म्हणाले की, पायी चालण्याचा वाटेगाव ते मुंबई असा इतिहास आहे तसाच मुंबई ते रशिया असा गौरवशाली इतिहास सुद्धा आहे.  

सकल मातंग समाज महाराष्ट्राचे समन्वयक रणधीर कांबळे म्हणाले की, समाजामध्ये अफवांचे पीक जास्त आहे; या अफवांपेक्षा संवाद साधूया. राजकीय लोकांनी समाजकारणात ढवळाढवळ करू नये असे सांगितले. 

बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. व्यंकटेश कसबे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मातंग समाजाची भूमिका या विषयावर इतिहास काळापासून मांडणी केली. यावेळी त्यांनी केडर बेस, ब्रॉड बेस आणि मास बेस आवश्यक असल्याचे सांगितले. 

सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक सचिन बगाडे यांनी, आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकतो का...? तेवढी ताकद समाजाची का नाही...? यासाठी आपल्या जाणीवांचा विकास करून सत्ता स्थापन करावी लागेल असे सांगितले. 

डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नातू आणि क्रांती सेनेचे अध्यक्ष यावेळी बोलताना म्हणाले की, समाजातील नेत्यांनी - कार्यकर्त्यांनी एकमेकांची बदनामी करू नये. एकमेकांना ताकद देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे तरच समाज, राजकारणामध्ये दखलपात्र होऊन सत्तेपर्यंत पोहोचू शकतो.

कुलदीप देवकुळे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ही चिंतन परिषद, राजकीय किंवा राजकारणासाठी नाही तर, राजकीय जाणीव- ज्ञान अधिक प्रगल्भ होण्यासाठी आहे. जातीय बहुमतापेक्षा राजकीय बहुमत हवे. मातंग समाजाची चळवळ, जातिवंत माणसांची चळवळ आहे. अशी इतिहासात नोंद होण्याच्या दृष्टीने ही चिंतन परिषद महत्वाची आहे.

यावेळी, बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे स्मारक समितीचे अशोक लोखंडे, कृष्णाई महिला मंचच्या अध्यक्ष सौ. विजया पृथ्वीराज बाबा पाटील, पाटील, दलितमित्र अशोक पवार, प्रा. लक्ष्मण मोरे, माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे, संदीप तात्या ठोंबरे, यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी, महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे, वीर फकिराचे वंशज सौरभ साठे, ॲड. सी. आर. सांगलीकर, भास्कर नेटके, श्रीपती सावंत, सॅमसन तिवडे, अर्जुन कांबळे, सूर्यकांत लोंढे, विजय आवळे, विरसेन कांबळे, संतोष सदामते, मिलिंद कांबळे, दत्ता पारसे, आबा सुवासे, दिनेश मोरे, हर्षल मोरे, निलेश मोहिते, विक्रम मोहिते, संतोष आवळे, शीतल वाघमारे, सनी आवळे, गणेश वायदंडे, सुशांत (गोलू ) कांबळे, विजयकुमार लोंढे, यांच्यासह अनेक नामवंत, कर्तुत्ववान, विचारवंत, अभ्यासक, चळवळीतील कार्यकर्ते - नेते प्रामुख्याने उपस्थित होते. 

स्वागताध्यक्ष मेजर आकाश तिवडे यांनी परिषदेचे उत्तम नियोजन केले. सूत्रसंचालन आणि आभार स्वाभिमानी स्वराज्य पक्षाचे नेते प्रशांत सदामते यांनी मानले.