| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २८ सप्टेंबर २०२४
माझे एक स्नेही श्री. श्रीहरी कुलकर्णी यांनी श्री. मयुरेश डंके, मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे, यांचा “दोष हा कुणाचा?” या मथळ्याखालील लेख माझ्या फेसबुक पेजवर शेअर केला होता. या लेखामध्ये श्री. मयुरेश डंके यांनी चांगल्या कुटुंबातील, शिकले सवरलेले लोक सार्वजनिक ठिकाणी कसे वागतात याचे वर्णन उदाहरणासह केले आहे
“चांगल्या कुटुंबातील, शिकली सवरलेली कांही माणसं हॉटेलमध्ये जेवण केल्यावर उघडपणे बचकभर बडिशेप टिश्यू पेपरमध्ये बांधून घेतात, चमचे चोरतात. विमानप्रवासात अक्षरशः ओंजळभरून चॉकलेटस् घेतात. रेझॉर्टमधील शॅम्पुचे सॅचेटस्, साबणाच्या छोट्या वड्यांचा बॉक्सच्या बॉक्स, मॅगझिन्स ढापतात. चिप्स, फळवाले, चणे-कुरमुरे विकणा-याकडील खाद्य पदार्थ चव पाहुया म्हणत तोंडात टाकतात आणि कांही खरेदी न करता तसेच निघून जातात.
दुकानात कॅरीबॅगसाठी हुज्जत घालतात. रस्त्याच्यामध्ये पार्किंग नसलेल्या जागी गाडी पार्क करतात. झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करतात, रस्यावर थुंकतात. कुल्फी खाऊन झाल्यावर काड्या तिथेच फेकतात. एटीएममध्ये गॉगल, हेलमेट घालून प्रवेश करतात. पेट्रोलपंपावर मोबाईलवर बोलतात, ट्रेनमधून, बसमधून विनातिकीट प्रवास करतात. मित्र, सहकारी, नातेवाईकाच्या वाढदिवसा दिवशी त्याच्या तोंडाला केक फासतात, रात्री मध्यरात्री दंगा करतात, दारू पितात.... अशा महाभागांच्या कर्तृत्त्वाची यादी खूप मोठी आहे.
आपल्या लेखामध्ये श्री. डंके पुढे लिहितात, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये याचा या लोकांना, गंध नसतो. पण त्यांचं हे असं वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही. ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं. अशा रितीने ही तथाकथित शिकलेली, आर्थिक सुस्थितीतील लोक गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात. स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात. या गोष्टी करून ही माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात? हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का? आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का?
या स्थितीवर श्री. डंके यांनी लेखामध्ये खूप महत्वाचे भाष्य केले आहे. 'लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते पण स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.' आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहतो, आरोप करत राहतो. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या ठेवतो, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो.
आपण स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल... सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..! समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तर ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील...
श्री. डंके यांच्या लेखाच्या पार्श्वभूमीवर मला बऱ्याच वर्षांपुर्वी जपानला त्सुनामीच्या संकटाला तोंड द्यावे लागले होते, त्या काळात प्रसिद्ध झालेले कांही व्हिडीओ व बातम्यांचे स्मरण झाले.
१. त्सुनामीमुळे उठलेल्या पाण्याची मोठी लाट जपानमधील एका शहराला येऊन थडकल्यावर शहरातील वीजपुरवठा बंद केला गेला. त्यावेळी कांही लोक मॉलमध्ये सामानाची खरेदी करत होते. वीजपुरवठा बंद झाल्यावर मॉलमधील लोकांनी आपण घेतलेल्या वस्तू रॅकमध्ये जिथल्या तिथे परत ठेवल्या व सर्वजण म़ॉलमधून रांगेने बाहेर पडले.
२. एका व्हिडीओमध्ये त्सुनामीच्या पुरामुळे बेघर झालेल्या लोकांची सोय मदत केंद्रामध्ये कशी केली होती ते स्पष्ट होत होते. मदत केंद्रामध्ये अन्न-खाद्य पदार्थांचे वाटप प्रथम महिला, लहान बालके, मुले, वृद्धांना केले जात होते. त्यांना झोपण्यासाठी पलंग देऊन तरूण जमीनीवर झोपी जात. आजारी, अपंग व्यक्तिची विशेष काळजी घेतली जायची. कुठेही तक्रार, घाई, गडबड, दंगा, रांग नसणे, आक्रस्थाळीपणा दिसून येत नव्हता.
३. त्सुनामीच्या काळात एटीएममध्ये नोटांचा तुटवडा होता. एटीएममधून कमीतकमी, गरजेपुरतेच पैसे काढण्याचे आवाहन बँकांनी लोकांना केले होते. एटीएममधून पैसे काढण्यावर रू. २५०० ची मर्यादा होती. सर्व लोक या आवाहनाचे काटेकोरपणे पालन करीत असत. त्याकाळात एटीएममधून पैसे काढण्याचे जे व्यवहार झाले होते त्यामध्ये रू. २५०० च्या विड्रॉवल्सचे प्रमाण अत्यल्प होते. मुख्य म्हणजे एटीएमवरील त्या काळात झालेले व्यवहार इतर दिवसांच्या मानाने खुप कमी होते.
४. या काळात वर्तमानपत्रे, टीव्ही, इंटरनेट अत्यंत संयमीतपणे बातम्या, बुलेटीन्स प्रसारित करत. वायफळ चर्चासत्रे, लोकांच्या दैन्यावस्थांचे अतिरेकी वर्णन, सरकारी यंत्रणाचे दोष, अशा प्रकारच्या बातम्यांना, व्हिडीओना पूर्णपणे फाटा होता. प्रसार माध्यमे त्सुनामी स्थिती, मदत कार्याची स्थिती, सुरक्षा नियम, घ्यावयाच्या काळज्या, लोकांचे मनोबल वाढवणाऱ्या बातम्या यांची माहिती देत असत. बातम्या ह्या फक्त बातम्या असत. त्यामध्ये वार्ताहरांचे मनाचे कॉमेंटस्, अतिशियोक्ती, अतिरेकीपणा, आक्रमता कुठेही नव्हती.
५. संवेदनशील मनाच्या व्यक्तिला विचार करण्यास भाग पाडणारी आणखी एक बातमी मला आठवली. त्सुनामीच्या त्या काळात वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती. अन्नधान्य, भाजीपाला, दुधाचा पुरवठा होत नव्हता, सर्वत्र टंचाई होती. लोकांना खाद्यपदार्थांचा साठा न करण्याची विनंती केली होती. खाद्यपदार्थांचे वाटप सरकारी यंत्रणा, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक करीत होते.
एका मदतकेंद्रावर एक स्वयंसेवक लोकांना ब्रेड वाटप करत होता. त्याच्या पुढ्यातील लोकांची रांग व त्याच्याकडील ब्रेडचा साठा दोन्ही संपत आले होते. ब्रेडच्या टोपलीत शेवटचे चार तुकडे आणि ब्रेड घेणा-याच्या रांगेत शेवटचे दोन लोक - एक वृद्ध व एक तरूण उरले होते. तरूणाचा नंबर वृद्धाच्या आधी होता. स्वयंसेवकाने त्या तरूणाला ब्रेड घेण्यासाठी बोलाविले. त्या तरूणाने आपल्या जागी त्या वृद्धाला ब्रेड घेण्यासाठी जाण्याची विनंती केली. तो वृद्ध ब्रेडचे तुकडे घेण्यासाठी स्वयंसेवकाकडे आला. स्वयंसेवकांने वृद्धाला ब्रेडचे दोन तुकडे दिले. वृद्धाने स्वयंसेवकाला ब्रेडचे आणखी दोन तुकडे देण्याची विनंती केली. त्याला स्वयंसेवकांने नम्रपणे नकार दिला. प्रत्येक व्यक्तिला ब्रेडचे दोनच तुकडे देण्याची सूचना असल्याचे सांगून एका व्यक्तिला ब्रेडचे दोनपेक्षा जास्त तुकडे देण्याबद्दल आपली असमर्थतता दर्शविली.
वृद्धाने त्या स्वयंसेवकाला त्याच्या (वृद्धाच्या) घरातील छोट्या नातवाने व आजारी सुनेने दोघांनी कालपासून कांहीही खाल्लेले नसल्याचे सांगितले. स्वतःसाठी मिळालेले दोन व मागत असलेले दोन ब्रेडचे तुकडे आपल्या नातवाला व सुनेला देणार असल्याचेही वृद्धाने स्वयंसेवकाला सांगितले. पण सांगितलेल्या सूचना पाळणे भाग असल्याचे पुन्हा सांगून स्वयंसेवकाने ब्रेडचे जादा तुकडे वृद्धाला दिले नाहीत. तो वृद्ध त्याला मिळालेले ब्रेडचे दोन तुकडे घेऊन हताशपणे जाऊ लागला.
रांगेतला शेवटचा तरूण पुढे आला. त्यांने त्याच्या वाटणीचे ब्रेडचे दोन तुकडे स्वयंसेवकाकडून घेतले आणि थोड्या अंतरावर चालत जात असलेल्या वृद्धाला नेऊन दिले.
हे चित्र व ते चित्र, दोन्ही चित्रांचे वर्णन संपले आणि माझ्या मनामध्ये विचार आला. मी काय केले असता माझ्याही देशाच्या सामाजिक जीवनात हा चांगला बदल घडून येईल ? परंतु मी हा असा, वयाची सत्तरी पार झालेला, अनेक बाबतीत परावलंबी असलेला, मी काय बरं करू शकतो ? माझ्या असहाय्यतेची जाणीव होऊन माझे मन खट्टु झाले. पण मनात उभारलेले प्रश्न माझा पिच्छा सोडेनात.
थोड्या वेळाने माझ्या मनाच्या एका कोप-यातून आवाज आला,
“राजा, मी कांही सुचवु कां?”
मी होकारार्थी मान डोलाविली. माझा होकार पाहून मनातील तो कोपरा म्हणाला,
“Charity Begins at Home, म्हणजे चांगल्या कार्याची सुरूवात स्वतःपासून होते.” एवढे बोलून मनातील तो कोपरा आपल्या जागी परतला. माझ्या मनातील त्या कोप-याच्या बोलण्यावर मी विचार करू लागलो. विचाराअंती माझ्या मनातील कोप-याला मला काय सुचवायचे आहे ते मला समजले.
रोजच्या दैनंदिन व सार्वजनिक जीवनात स्वयंशिस्त, स्वच्छता, टापटीप, शिस्त पाळण्याच्या, सर्वाशी प्रेमाने, सहकार्याने वागण्याचे जर मी मनाचा दृढ निश्चय करून ठरवले तर त्याच्या आड माझे उतार वय, परावलंबन, असहायता, किंवा माझ्यातील इतर कोणतीही कमतरता येऊ शकत नाहीत.
मला समजले, माझ्या देशाच्या सामाजिक जीवनात चांगला बदल घडून यावा, सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ व्हावे, आणि “अच्छे दिन” यावेत, अशी जर माझी मनापासून इच्छा असेल तर त्याची सुरवात मला माझ्या स्वतःपासून केली पाहिजे. हे करता “अच्छे दिन” दूर असणार नाहीत हे नक्की.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण