| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ सप्टेंबर २०२४
मंगळवारची संध्याकाळ मावळली ती सांगलीचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या 'निवडणूक न लढवण्याच्या लेटर बॉम्बने'... गेले काही दिवस आ. सुधीरदादा गाडगीळ हे आपल्या राजकीय प्रवासाबाबत वेगळ्या निर्णयाच्या विचारात होते. निकटच्या सहका-यात त्यांनी आपला हा विचार बोलूनही दाखविला होता. परंतु सुरुवातीपासून त्यांच्या या निर्णयाला सर्वांकडूनच विरोध होत होता. अखेर आपले बंधू श्री गणेश गाडगीळ व कुटुंबीयांसमवेत समवेत बसून, त्यांनी या निर्णयावर चर्चा केली आणि सांगलीकरांच्या माहितीसाठी विविध प्रसार माध्यमातून पाच पानी निवेदनातून हा निर्णय जाहीरही केला.
स्थानिक डिजिटल मीडियातून आणि विविध समाज माध्यमातून आ. सुधीर दादा गाडगीळ यांचा हा 'लेटर बॉम्ब' सर्वदूर पोहोचला आणि एकच खळबळ माजली. दुसऱ्या दिवशी प्रिंट मीडियानेही ही बातमी प्रसिद्ध केली. हा निर्णय घेण्यापूर्वी आ. सुधीरदादांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह ती विविध वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली असल्याचे बोलले जाते. अर्थात अद्यापपर्यंत यापैकी कोणीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नसली तरी आ. सुधीरदादांचा हा निर्णय कोणालाच पटलेला नाही.
सांगलीच्या राजकारणावर परिणाम करणारा हा निर्णय आ. सुधीरदादा बदलणार का ? आणि जर बदलला नाहीच तर सांगली विधानसभेसाठी महायुतीकडून कोण ? हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. कारण महाआघाडी प्रमाणेच महायुतीतही सांगली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे मांदियाळी दिसून येत आहे. जर सर्वमान्य नावावर शिक्का मुहूर्त होऊ शकले नाही, तर लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भाजपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि याचमुळे आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.