| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २३ सप्टेंबर २०२४
सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाआघाडीच्या जागा वाटपावरून उत्सुकता ताणलेली असतानाच उद्याच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. आणि तो निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टात 313 व्या क्रमांकावर असलेला आमदार अपात्रतेची प्रकरणाची सुनावणी. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट यांनी शिंदे गटाच्या, तर शरद पवार गटाने अजितदादा गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर दोन्ही बाजूने युक्तिवादही पूर्ण झाला आहे. याप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वी ते याप्रकरणी काय निर्णय देतात, याकडे विधी आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही आपल्या सोबत प्रत्येकी 40 आमदार घेऊन महायुतीशी घरोबा केला. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील आमदारांना अपात्र न केल्याने, 'आयत्या घरात घरोबाचा' आरोप करीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
आता उद्या या प्रकरणाचा निकाल लागतो का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु उद्याच आयकर विभागाशी संबंधित एका मोठ्या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याने, आमदार अपात्रता प्रकरणी पुढची तारीख मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.