| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षात उमेदवारीसाठी मोठी चढाओढ निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु त्याचवेळी पक्षश्रेष्ठी आणि मतदारात आपली इमेज निर्माण करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यां मार्फत अनेकांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. सांगलीही याला अपवाद नाही. भाजप-काँग्रेससह महायुती महाआघाडीमध्ये चोरस पहावयास मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यातही उमेदवारी मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठ कडे मागणी करण्यात आली आहे. श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी तर उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करण्याचे संकेत दिल्याने सांगली विधानसभा मतदार संघात हा चर्चेचा विषय बनला आहे. सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात 'वसंतदादा गट' कार्यान्वित आहे. मदन पाटील हयात असताना काँग्रेसमध्ये दादा गट व मदन भाऊ गट स्वतंत्ररित्या राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे या दोन्ही बलाढ्य गटादरम्यानच ग्रामपंचायतीपासून विधानसभा ते अगदी लोकसभेपर्यंत टसल झाल्याचे पहावयास मिळाले.
मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या दोन्ही गटांसह संपूर्ण काँग्रेस विशाल पाटील यांच्या पाठीशी होती. आणि याचमुळे त्यांना विजय सोपा गेला. काँग्रेसने कितीही वल्गना केल्या तरी गटबाजीची ही किनार आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिक व्यापक होताना दिसत आहे. आणि याच गटबाजीचा फटका काँग्रेसला होणार असल्याचे बोलले जात आहे.
पृथ्वीराज पाटील यांनी सबुरीचे धोरण घेतले असतानाच श्रीमती जयश्रीताई पाटील यांचा गट मात्र अधिक आक्रमक होताना दिसत आहे. दोन दिवसापूर्वी या गटाच्या माजी नगरसेवकांनी जयश्रीताई पाटील यांच्या समर्थनार्थ पत्रकार बैठक घेऊन पृथ्वीराज पाटील यांना टार्गेट केले होते. नुकतेच पृथ्वीराज बाबांनी हे पत्रकार परिषदेतून जयश्रीताई पाटील या आमच्या नेत्या असून त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर असल्याचे सांगून मी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणार नाही असे जाहीर केले असतानाच काल पुन्हा मदन भाऊ पाटील गटाच्या काही नेत्यांनी पत्रकार बैठक घेत पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात तोफ लागली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी पंधरा दिवसांपूर्वी सांगली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील कोणताही उमेदवार निश्चित झाला नाही असे सांगितले होते. असे असतानाही सांगलीचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी मीच महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असा दावा करणे हास्यस्पद असून, त्यांनी भाजपा सांगलीत काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केला होता. मात्र तो आरोप पूर्णपणे खोटं असून यापूर्वी पृथ्वीराज पाटील यांनीच भाजपच्या नेत्यांची भेट घेतल्या असून आगामी विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील हेच भाजपचे उमेदवार असतील असा हल्लाबोल जयश्रीने पाटील यांच्या समर्थक कय्युम पटवेकर, माजी महापौर किशोर शहा, सांगली महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, शितल लोंढे, अजित सूर्यवंशी आदींनी पत्रकार बैठकीत केला आहे.
2024 मध्ये सांगली विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित होण्याची शक्यता असल्याने, काँग्रेसने येथे महिलांना संधी देण्याचा विचार केला आहे. त्या दृष्टीने काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागितले आहे. परंतु पक्षाने उमेदवारी जाहीर केली नसतानाही आपणच उमेदवार आहोत असे म्हणणे हास्यास्पद असल्याचे सांगून ते प्रदेशाध्यक्ष मोठे झाले आहेत का असा असावा या नेत्यांनी केला.
गेल्या दहा वर्षात पृथ्वीराज पाटील सांगलीत राहतात. तर पूर्वी ते अठरा वर्षे मिरजेत राहत होते. अशावेळी जिल्ह्यातील काँग्रेस वाढविली म्हणणे चुकीचे असल्याचा आरोप माझे महापौर किशोर शहा यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना संतोष पाटील म्हणाले की पृथ्वीराज पाटील हेच भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत त्याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत असा आरोप करून मी निवडणुकीत भाजपचे तेच उमेदवार असतील असा दावा त्यांनी केला आहे. गेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिलेला शब्द ते पाळत नाहीत, तर जनतेचा शब्द कसा पाळणा असा प्रश्न पत्रकार बैठकीत उपस्थित केला आहे.
दरम्यान सांगलीच्या विधानसभा जागेवरून काँग्रेसमध्ये रसिकेत सुरू असून, यापूर्वी श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू अशी घोषणा केली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याचे लक्ष सांगलीकडे लागले आहे. सांगली लोकसभा निवडणुकीप्रमाणेच सांगली विधानसभा निवडणुकीतही 'सांगली पॅटर्न' राबविला जाणार का आणि तो यशस्वी होणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे.