Sangli Samachar

The Janshakti News

वेलीचे वाळलेले खोड ! (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २४ सप्टेंबर २०२४
जीवनामध्ये क्षणाक्षणांला ज्या घटना घडत असतात, मनामध्ये जे विचार येत असतात त्यामागे कोणते ना कोणते तरी कारण निश्चितपणे असते. त्या कारणांच्या तळाला जाऊन शोध घेतला असता, जीवनाला उपयोगी असणारे, आनंद देणारे तत्त्व नक्की गवसते, याचा अनुभव मला नुकताच आला.   

“अर्रेच्या, व्वा, ही तर कमालच झाली !” 
हे आश्चर्याचे उद्गार माझ्या तोंडातून आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये ठेवलेल्या कुंड्यांपैकी एका कुंडीतील, पूर्णपणे वाळलेल्या वेलाच्या खुरटलेल्या खोडातून हिरव्यागार, ताज्या, तरतरीत पानांचा नवा वेल फुटल्याचे पाहून बाहेर पडले. 

पूर्ण वाळलेले ते खोड व हिरव्यागार पानांचा तो नवा वेल पाहत असतांना माझ्या मनात एक विचार आला: या वाळलेल्या खोडाला पाहून हा वेल मेला आहे, असे मी कालपर्यंत समजत होतो, पण याचा तर पुर्नजन्म होऊन एका नव्या रूपात हा प्रगट झाला आहे. 

मनात उमटलेल्या विचारातूनच चालना घेऊन माझ्या मनात एक वेडी आशा डोकावलीः माझ्या शरीराची अवस्था या वाळलेल्या खोडासारखी आहे. डोक्यावरील सर्व केस पिकून पांढरे झाले आहेत. हात-पाय व इतर अवयव थकले आहेत. शरीरभर सुरकुत्या उमटत आहेत. दृष्टी अधू झाल्याने चष्मा लावल्याशिवाय तीन-चार फुटांबाहेरचे दिसत नाही, जीभ जड झाली आहे, उच्चार अडखळत आहेत, अपचन, थकवा, औषधांनी मैत्री केली आहे. अशा स्थितीतील माझे हे शरीर कांही दिवसांनी नाश पावणार हे नक्की पण... जशी या वाळलेल्या खोडातून पालवी फुटुन वेलाचा पुनर्जन्म झाला आहे, त्याला नव-जीवन मिळाले आहे, तसे माझ्या या जीर्णशिर्ण शरीराचे रूप बदलुन मलाही नवजीवन मिळेल कां?” 


माझ्या मनातील आशेला राल्फ वाल्डो इमर्सनच्या, “आत्मा बाहेरून मानवी शरीरात तात्पुरते निवासस्थान म्हणून येतो, आणि त्यातून तो बाहेर पडून एका नव्या रूपात इतरत्र वस्ती करण्यास जातो, कारण .... आत्मा अमर आहे”-१, या सुवचनाचा आधार मिळाला. सृष्टी निर्मात्याला, रचियत्याला लवकरात लवकर माझा पुनर्जन्म होऊन मला नवजीवन मिळूदे अशी आळवणी करत, हा आनंदाचा क्षण कधी व कसा येईल या विचारात मी मग्न झालो.    

कांही वेळ असाच गेला आणि माझ्या कानांवर थरथरत्या, काप-या आवाजातील कांही शब्द पडले. “मला माहिती आहे, पुनर्जन्म कधी होतो, नवजीवन कधी मिळते. तुमच्या मनात काहुर उठवलेल्या प्रश्नांच्या उत्तराबाबत मी कांही सांगु कां?” 

आवाजाच्या दिशेने मी पाहिले आणि मला फिरून एकदा आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. कुंडीतील वेलाचे ते वाळलेले खोड माझ्याशी बोलत होते. कसाबसा स्वतःला सावरत असताना माझ्या मनात विचारांनी गर्दी केलीः वृक्ष-वेली बोलतात?, आणि तेही मनुष्यांशी? माझ्या-एका मनुष्याच्या, मनातील विचार या खोडाला कसे काय समजले? या खोडाला पुनर्जन्म, नवजीवनाची माहिती आहे? माझी वृद्धावस्था संपून मला पुनर्जन्म कधी व कसा मिळेल याचे उत्तर या खोडाला देता येइल? वयोमानामुळे मला भ्रम तर होत नाहीना याची खात्री स्वतःला चिमटा काढून मी करून घेतली. मला भ्रम झालेला नव्हता. वेलीचे ते वाळलेले खोड खरोखरीच माझ्या बरोबर बोलत होते. 

“अंमळसे माझ्या जवळ या, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो.” 
वाळलेल्या खोडाच्या बोलाने मी भानावर आलो व त्याच्या जवळ गेलो. ते खोड सांगु लागले,

“वृक्ष-वेली, झाडे, पाने, फुले, आकाश, पाणी, वारा, नदी, समुद्र, पाऊस, पशु-प्राणी, किटक, इतकेच काय दगड, धोंडे, माती, .... निसर्गातील सर्व घटक निसर्गाशी जवळीक साधत असल्याने, त्याच्याशी एकरूप होत असल्याने स्वतःशी व इतरांशी संभाषण, वार्तालाप व विचारांचे आदान-प्रदान करू शकतात. निसर्ग त्याच्याशी जवळीक साधणा-यांना, एकरूप होणा-यांना ग्रहणक्षम बनवतो, त्यांची ग्रहनशीलता विकसित करतो. 

आम्ही वृक्ष-वेली निसर्गाशी जवळीक साधतो, त्याच्याशी एकरूप होतो त्यामुळे, स्थळ, काळ, अंतर यांना पार करून अंतरिक्षात पसरलेले विचार आम्ही ग्रहण करू शकतो, समजु शकतो. या निसर्गदत्त ग्रहणक्षमतेमुळे तुमच्या मनातील विचार मला समजले.”

माझ्या दोन प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन ते वाळलेले खोड म्हणाले, 

“आता तुमचे महत्वाचे प्रश्नः ‘पहिला प्रश्न - या वाळलेल्या खोडाला, पुनर्जन्म, नवजीवन या बाबत माहिती आहे कां? आणि दुसरा प्रश्न - तुमची वृद्धावस्था संपुन तुम्हाला पुनर्जन्म कधी व कसा मिळेल?” 

“वृद्धावस्था, पुनर्जन्म, नवजीवनाबाबत माझी संकल्पना नेहमीच्या प्रचलित संकल्पनेपेक्षा थोडी वेगळी आहे.” ते वाळलेले खोड मला म्हणाले. “माझ्या मते, वृद्धावस्था ही मनात साठलेल्या विचारांनी निर्माण केलेली स्थिती आहे. मनामध्ये साठलेल्या विचारांमध्ये, दृष्टिकोनामध्ये व मतांमध्ये बदल होणे म्हणजे पुनर्जन्म होणे आणि अशा रितीने मिळालेल्या पुनर्जन्मातील बदललेली जीवनशैली म्हणजे नव-जीवन.” 

ते वाळलेले खोड पुढे सांगु लागले. 
“दिवस, रात्र, महिने, वर्षांच्या आधारावर कालमापनाची कल्पना तुम्हा मानवांनी निर्माण केली आहे. निसर्गातील काळाला भूत-भविष्यकाळ नसतो. काळ अखंड असतो, त्यातील प्रत्येक क्षण प्रवाहित असतो आणि त्यामुळे तो नवाही असतो. या प्रत्येक नव्या क्षणाकडे जो लक्ष देतो, त्याला जाणतो, त्याला अनुभवतो, तो भूतकाळातील घटनांवर किंवा अनारोग्य, अपंगत्व, वृद्धत्वाच्या विचारांना चिकटून राहात नाही आणि भविष्यकाळातील मृत्यू, पुनर्जन्म, नवजीवन अशा विचारांमागे धावुन, हाती असलेल्या वर्तमानकाळातील प्रत्येक नवा क्षण गमावत नाही.”   
 
ते वाळलेले खोड सांगत असलेले हे विचार मला नवे होते. मी वाळलेल्या खोडाचे बोलणे लक्ष देऊन ऐकू लागलो. 

“वृद्धावस्था, पुनर्जन्म, नवजीवन याबाबत तुमचे विचार मानव निर्मित आहेत. त्यांचा त्याग करून त्यात बदल करून तुम्ही निसर्ग निर्मित वर्तमान काळात ज्या क्षणाला जगणे सुरू कराल, त्या क्षणाला तुमचा पुनर्जन्म होईल. तुमच्यासाठी सकारात्मकता, प्रेम, आनंदाचे दरवाजे उघडले जाऊन तुम्हाला नवजीवन प्राप्त होईल. नेहमी लक्षात ठेवा." 

“वृद्धत्व जरी वेग कमी करत असले तरी ते अनुभव आणि समज यात वाढ करत असते.-२
खरं तर, तुम्ही हसायचे किंवा खेळायचे थांबवत नसता त्यावेळी तुम्ही म्हातारे होत नसता, तुम्ही त्यावेळी म्हातारे होता ज्यावेळी तुम्ही हसायचे, खेळायचे थांबवता.-३
नेहमी लक्षात ठेवा. “उजाडणारी प्रत्येक सकाळ ही आपल्या आयुष्याच्या पुनर्जन्माचे प्रतीक आहे. त्यामुळे कालचे सगळे वाईट क्षण विसरून जा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस बनवा.-४ 

“आता शेवटचे महत्वाचे सांगतो.” 
ते वाळलेले खोड मला म्हणाले. 
“मी तुम्हाला हे जे सर्व सांगितले त्यातून तुम्हाला आता समजले असेल की, वृद्धत्व, व त्यातील समस्या हे वय किंवा शारीरिक स्थितीवर अवलंबुन नसतात तर, आपल्या विचारांवर अवलंबुन असतात. त्यामुळे आपण जर आपले विचार बदलले तर, वृद्धत्व व त्याच्या समस्यातून आपल्याला सुटका मिळते व जीवन जगण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. जीवनाला पुन्हा नवी पालवी फुटते.” 

इतके सांगून वेलीच्या त्या वाळलेल्या खोडाने आपले बोलणे थांबवले. वाळलेल्या, मरणावस्थेला टेकलेल्या वेलीच्या खोडाला पालवी फुटलेली ही तशी साधी घटना पण जीवनाला उपयोगी असणारे, आनंदाचे तत्त्व सांगणारी घटना मला खूप कांही शिकवून गेली. आणि त्यातून समजलेले नवे विचार माझ्या रोजच्या जीवनात कसे आणायचे व आनंदात राहुन आपला पुनर्जन्म कसा साजरा करायचा यावर विचार करत मी बाल्कनीतून मागे फिरून माझ्या खोलीकडे परतलो.
आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण 

संदर्भः इंग्रजी भाषेतील मूळ सुवचने - 
१. “The Soul comes from without into the human body, as a temporary abode, and it goes out of it a new, …. it passes into other habitations, for the Soul is immortal.” - Ralph Waldo Emerson
२. “Though aging reduces speed, it increases experience and understanding” - Ernest Agyemang Yeboah
३. “We don’t stop playing because we grow old; we grow old because we stop playing.” “You don’t stop laughing when you grow old, you grow old when you stop laughing.” George Bernard Shaw
४. “Every morning is a symbol of rebirth of our life, so forget all yesterday’s bad moments and make today the most beautiful day of your life.” - Buddha