Sangli Samachar

The Janshakti News

पुणे-हुबळी वंदेभारत एक्सप्रेस सुस्साट... सांगली रेल्वे स्टेशनला रेड सिग्नल, तर साताऱ्याला ग्रीन सिग्नल नव्या वादाला तोंड फुटणार ?


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ सप्टेंबर २०२४
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील आणि भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्टचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेससाठी सांगली रेल्वे स्टेशन थांब्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी आणल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली होती. परंतु हा थांबा तांत्रिक कारणास्तव रद्द केल्याची बातमी सांगलीत पोहोचली आणि नव्या वादाची एक्सप्रेस या ट्रॅकवरून धावू लागली.

याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला सांगलीतील थांब्याबाबत कोणतीही अधिसूचना या कार्यालयाकडे प्राप्त झाली नसल्याचे सांगून वादाला तोंड फोडले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सांगली नागरिक जागृती मंच तसेच विविध संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.


माजी खासदार संजय काका आणि रेल्वे कोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा यांच्या प्रसिद्धी पत्रकानंतर स्थानिक आमदार, भाजपाचे पदाधिकारी यांनी केंद्र शासन व रेल्वे प्रशासनाला धन्यवाद दिले होते. परंतु थांबा नसलेल्या माहिती स्वप्निल निला यांनी जाहीर केल्यानंतर, माजी खासदार संजय काका यांनी म्हटले आहे की, या एक्सप्रेसला मंजुरी मिळाली असून, त्यामध्ये सांगलीचा थांबाही समाविष्ट असल्याने तो रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही. दोनच दिवसात दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करणार असल्याचेही संजय काका यांनी म्हटले आहे.