yuva MAharashtra राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नव्या पक्षाची घोषणा, याच पक्षातर्फे लढणार विधानसभा !

राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नव्या पक्षाची घोषणा, याच पक्षातर्फे लढणार विधानसभा !


| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि. १९ सप्टेंबर २०२४
शिरोळ तालुक्याचे नेते, माजी मंत्री व विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली असून, आगामी विधानसभा निवडणूक ते याच पक्षातर्फे लढवणार आहेत. यड्रावकर यांचा हा महायुतीसाठी धक्का आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गटासाठी ही बातमी काळजी करण्यासारखी मानली जाते.

राजेंद्र पाटील यड्रावकर हे पूर्वाश्रमीचे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. यड्रावकर यांचा सहकारी साखर कारखाना शरद पवार यांच्या नावेच स्थापन केला होता. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी पंगा घेत वेगळी चूल मांडल्यानंतर, यड्रावकर यांनी या चुलीवरच आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. परंतु आता विधानसभेच्या ऐन निवडणूक तोंडावर घेतलेला हा निर्णय अजित पवार यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. कारण यड्रावकर रावकर यांची शिरोळ तालुक्यात राजकीय ताकद वाखाणण्याजोगी आहे. 


राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सख्खे बंधू, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडी या नावे केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्याला मंगळवारी मंजुरीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता यड्रावकर गट आगामी विधानसभा निवडणुकी बरोबरच स्थानिक विकास संस्थांच्या निवडणूक आहे याच अधिपत्याखाली लढवणार आहे.

संविधानाचा आदर राखून सर्व समाजातील घटकांना सोबत घेत जनहिताचे काम करणे, सामान्य माणसाला न्याय मिळून देणे, ही राजर्षी शाहू विकास आघाडी चे मुख्य धोरण आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एकाच वेळी महायुती, महाआघाडी आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष अशा तिहेरी शक्ती विरुद्ध लढा उभा करायचा आहे. यात त्यांना कितपत यश येते हे येणाऱ्या काळात दिसून येईल.