yuva MAharashtra केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी उमेदवारासह राजकीय पक्षांसमोर उभे केले धर्मसंकट !

केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी उमेदवारासह राजकीय पक्षांसमोर उभे केले धर्मसंकट !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ सप्टेंबर २०२४
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने संभाव्य उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांसमोर धर्मसंकट उभे केले आहे. यंदाच्या निवडणुकीत विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार याबाबतीत महायुती आणि महाआघाडीमध्ये मोठी चुरस मिळणार असून, येत्या काही दिवसात आचारसंहितेसह निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका घोषणेद्वारे जणू संभाव्य उमेदवार आणि सर्वच राजकीय पक्षांची बोलतीच बंद केली आहे.

या आगामी निवडणुकीचे माहिती देत असताना राजीव कुमार त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला एका शपथपत्राद्वारे त्याची वैयक्तिक माहिती द्यावी लागणार असून, स्थावर आणि जंगम मालमत्ता बाबतची माहिती, त्याचबरोबर त्याच्यावर गुन्हे दाखल असल्यास त्याची माहिती निवडणूक काळात वृत्तपत्रातून व वृत्तवाहिनीतून तीन वेळा जाहिरातीद्वारे माहिती द्यावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर, ज्या राजकीय पक्षातर्फे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची निवड का केली ? तेथे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार मिळाले नाहीत का ? याबाबतची माहिती जनतेला द्यावी लागणार आहे. 


निवडणूक म्हटली की, विविध प्रलोभने स्त्रियांना साड्या तर पुरुषांना दारू व पार्टीसाठी पैसे वाटले जातात. मात्र आता अशा प्रकारावर पोलिसांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचे करडी नजर असणार आहे. जिथे पैसे, दारू, पार्ट्या, भेटवस्तू दिल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांच्या या भूमिकेमुळे यंदाची विधानसभा निवडणूक धाक-दडपशाही मुक्त वातावरणात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणेसह प्रशासनाने या नियमांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली, तर विधानसभेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार दिसण्याची शक्यता कमी आहे.

इतकेच नव्हे तर, या काळात मद्य, गुटखा आदी पदार्थांच्या वाहतुकीवर कडक नजर असणार आहे. निवडणुकीत वाटण्यासाठी पैशाचा गैरवापर होऊ नये म्हणून, वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे, यामधून एटीएम साठी रक्कम वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही सुटका होणार नाही. मध्यंतरी रुग्णवाहिकेमधून पैसे व दारूची वाहतूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या काळात रुग्णवाहिकांवरही नजर असणार आहे.

निवडणूक काळात फेक व पेड न्यूज प्रसारित करण्यात येतात. अशा माध्यमांवर निवडणूक आयोग लक्ष ठेवून असून, सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघातून 9.59 कोटी मतदार असून, पुरुष मतदार 4.95 कोटी तर स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत. थर्ड जेंडर चे 5,997, दिव्यांग 6.32 लाख मतदार आहेत. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी आहे. राज्यात एकूण मतदार केंद्राची संख्या 1,00,186 आहे, पैकी शहरी भागात 42,585 तर ग्रामीण भागात 57,601 बूथ असणार आहेत.