yuva MAharashtra सांगलीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाने ओळखली जाणार, समाजात समाधान व्यक्त !

सांगलीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाने ओळखली जाणार, समाजात समाधान व्यक्त !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ सप्टेंबर २०२४
राज्यातील 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाज सुधारक आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींचे नाव देण्याचा निर्णय मुंबई येथे नुकताच पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार सांगलीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात येणार आहे. साठ वर्षांपूर्वी स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने सांगलीतील वसंतदादा औद्योगिक परिसरात ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे.

गेली साठ वर्षे 'शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था' या नावानेच या संस्थेची ओळख आहे. 'आयटीआय' म्हणूनही ही संस्था ओळखली जाते. आजपर्यंत या प्रशिक्षण संस्थेतून हजारो घडले आहेत. अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तर काहींनी नोकरीच्या माध्यमातून आपले करिअर केले आहे. शासनाच्या या निर्णयाने आता 'अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था' या नावाने परिचित होईल.


सांगलीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिल्याने, त्यांच्या अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण असून, या निर्णयामुळे या महान लोकशाहीराची ओळख नव्या पिढीला होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे कुलदीप देवकुळे यांनी दिले आहे.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी अनेक कलाकृतीच्या माध्यमातून स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी लिहिलेल्या कथा, लोकगीते आणि इतर साहित्य आजही तितकेच प्रभावी आहे. सध्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणावर करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अण्णाभाऊंचे नाव देणे मोठी उपलब्धी ठरणार आहे.