| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. ३० सप्टेंबर २०२४
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी हे आपल्या सडेतोड व स्पष्टवक्तेपणामुळे जनतेत लोकप्रिय आहेत. जे पटत नाही त्यावर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ते आपले मते व्यक्त करीत असतात. यापूर्वी त्यांनी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. आता त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेवरून शिंदे सरकारचे कान टोचले आहेत. यावरून आता विरोधकांनीही पुन्हा एकदा धारेवर धरले आहे.
नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना ना. नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेवरून शिंदे सरकारवर टीका करताना म्हटले आहे की कोणत्याही अनुदानासाठी अवलंबून राहू नका. सरकार हे विष कन्या असते, ज्याच्याबरोबर जाते त्यांना बुडवते. म्हणूनच जे काही अनुदान मिळते ते घेऊन टाका पण कधी मिळेल केव्हा मिळेल याचा भरवसा ठेवू नका.
ना. गडकरी यांनी व्यक्त केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी राज्य सरकार पैशाचा अपव्यय करत असून केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही असा सवाल करून, ही योजना लाडक्या बहिणीसाठी नसून उद्याच्या निवडणुकीत शिंदे गटाला मत मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीवर फार प्रेम उफाळून आले आहे असे नाही, असे म्हटले आहे.