| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे पृथ्वीराजबाबा पाटील व श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज बाबा व श्रीमती जयश्री ताई यांनी सामाजिक समस्यांवर महापालिका तसेच शासकीय प्रशासनाला धारेवर धरले होते. परंतु अचानक या दोन्ही नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमातून अचानक एक्झिट घेतल्याने नागरिकात चर्चेचा विषय बनला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या थोडक्या मतांनी अपयश पदरात पडलेले काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील हे खचून न जाता पुन्हा कार्यरत झाले. काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध आंदोलनातून पृथ्वीराज बाबांनी रणसिंग फुंकले होते. विशेषतः 2019 चा आणि त्यानंतर आलेल्या सर्वच महापुरात सापडलेल्या नागरिकांना पृथ्वीराज पाटील फाउंडेशन तर्फे मदतीचा हात दिला होता. त्याचप्रमाणे कोरोना काळातही पृथ्वीराज पाटील यांनी नागरिकांना दिलेली मदत चर्चेचा विषय ठरली होती.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच आलेल्या महापुरात पृथ्वीराज बाबा पाटील यांच्याप्रमाणेच जयश्रीताई पाटील यांनीही मदन भाऊ पाटील युवा मंचच्या माध्यमातून मदतीचा हात दिला होता. याशिवाय गेल्या दोन-तीन महिन्यापासून विविध सामाजिक समस्येवर दोघांनीही मोठी आघाडी उघडली होती. विशेषतः पृथ्वीराजबाबा पाटील यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची पेन्शन योजनेचे आंदोलन, रिक्षा संघटनेचे आंदोलन, त्याचप्रमाणे विविध प्रश्नावर प्रशासनाकडून या समस्या सोडविण्यासाठी अग्रवागी राहून पुढाकार घेतला होता.
नागरिकांतून पृथ्वीराज बाबा पाटील यांना उत्तम प्रतिसादही लाभत होता. त्याचवेळी जयश्रीताई पाटील यांच्या समर्थक नगरसेवकांनी पत्रकार बैठकीतून पृथ्वीराज बाबा यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र पृथ्वीराज बाबा पाटील असो किंवा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी मात्र संयमी भूमिका घेत एकमेकांवर आरोप करणे टाळले होते. मात्र गेल्या महिन्याभरापासून या दोन्ही नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमातून अचानक एक्झिट घेतल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.