yuva MAharashtra अरे बापरे, आ. गोपीचंद पडळकर हे काय बोलून गेले ? चक्क जनतेला कुत्र्याचं मटन खावे लागण्याचे वक्तव्य केल्याने नवा वाद !

अरे बापरे, आ. गोपीचंद पडळकर हे काय बोलून गेले ? चक्क जनतेला कुत्र्याचं मटन खावे लागण्याचे वक्तव्य केल्याने नवा वाद !


| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २३ सप्टेंबर २०२४
आपल्या रोखठोक बोलण्याने महाराष्ट्रातील वादग्रस्त ठरलेल्या राजकीय व्यक्तिमत्वात आ. गोपीचंद पडळकर यांचे नाव नेहमीच घेतले जाते. 'मनात येईल ते ताडकन बोलण्याची' त्यांची ख्याती आहे. कोणत्याही परिणामाची पर्वा न करता आ. पडळकर जाहीर भाषणातून बोलत असतात. आणि बोललेले वक्तव्य पुन्हा माघारी न घेण्याची ही त्यांची ख्याती आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी प्रमाणेच धनगर समाज ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. धनगर समाजाने आज पासून आरक्षणासाठी एल्गार पुकारलेला आहे. राज्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन करून, सरकारला कोंडी पकडले आहे यामध्ये सर्वात आघाडीवर आहे ते महायुतीतीलच एक नेते आ. गोपीचंद पडळकर.

परंतु आंदोलनादरम्यान आ. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाचे बाजू मांडताना एक धक्कादायक विधान केले असून त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माध्यमांशी बोलताना आ. पडळकर म्हणाले की, 'धनगरांनी बकरी पाळण्याचे बंद केले तर जनतेला कुत्र्याचे मटन खावे लागेल.' आता त्याच्या या विधानावरून विरोधक,  आमदार पडळकर यांच्यापेक्षा भाजपलाच टार्गेट करण्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणुकीत केंद्र भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मोदी काहीसे अडचणीत असल्याचे दिसत असले तरी, त्यांचा करिष्मा संपला असे म्हणणे घाईचे ठरू शकते. मात्र मोदींचा करिष्मा संपवण्यासाठी भाजपा आणि महायुतीतील काही नेत्यांना घाई झाली आहे असे चित्र दिसत आहे. भाजपचे नितेश राणे, अनिल बोंडे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यामध्ये आता गोपीचंद पडळकर यांचा समावेश झाला आहे.

आ. गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य भाजपा कितपत गांभीर्याने घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेषतः विरोधी पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे. खास करून त्यांचे हे वक्तव्य जत विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून त्यांना अडचणीचे ठरू शकते. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याला भाजपा उमेदवारी देणार का ? असा सवाल आत्तापासूनच विचारला जाऊ लागला आहे.