yuva MAharashtra सांगलीकरांना मिळणार चांदोली धरणातील बिसलेरीप्रमाणे शुद्ध पाणी, शरद पवार यांनी घेतला पुढाकार, लवकरच बैठकीचे नियोजन !

सांगलीकरांना मिळणार चांदोली धरणातील बिसलेरीप्रमाणे शुद्ध पाणी, शरद पवार यांनी घेतला पुढाकार, लवकरच बैठकीचे नियोजन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ सप्टेंबर २०२४
सांगलीकरांच्या दृष्टीने मिळणारे अशुद्ध पाणी हा नेहमीच चर्चेचा आणि नाराजीचा विषय राहिलेला आहे. कृष्णा नदीत मिसळणाऱ्या शेरी नाल्यासह कराड पासून सांगली पर्यंत विविध ठिकाणचे सहकारी साखर कारखाने, औद्योगिक वसाहती व नदीकाठच्या गावातील मिसळणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. सांगलीकरांनी अनुभवलेली 1972 साली आलेले टायफाईडची साथ जगाच्या चर्चेचा विषय बनली होती. याच शेरी नाल्याच्या मुद्द्यावर अनेक निवडणुका लढल्या आणि जिंकल्या गेल्या. 

मध्यंतरी दिवंगत नेते स्व. मदन भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने वारणा उद्भव योजना आखण्यात आली. उद्घाटनाची कुदळही मारली. परंतु झारीतील शुक्राचार्यामुळे हे पाणी सांगलीकरांच्या मुखात पडू शकले नाही. यावरूनही बरेच राजकारण रंगले. हा विषय मागे पडल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या निधीतून शेरी नाल्याचे दूषित पाणी शुद्ध करून शेतीला देण्याची योजना आखण्यात आली. परंतु तीही अर्धवट राहिली. 


या पार्श्वभूमीवर कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एका बैठकीत शरद पवार यांनी या प्रश्नावरून एका व्यापक बैठकीचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खा. सुप्रियाताई सुळे, महापौर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजयकुमार दिवाण यांनी चांदोली धरणातून सांगली शहराला थेट पाईपलाईन द्वारे पाणी मिळण्याची आवश्यकता आणि आराखडे सादर केले. या आराखड्याचा अभ्यास करून आपण लवकरच बैठकीचे नियोजन करू असे शरद पवार यांनी सांगितले आहे

मुंबईतील या बैठकीमुळे आता सांगलीकरांना बिसलेरी प्रमाणे शुद्ध पाणी मिळण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी कृष्णा महापौर नियंत्रण कृती समितीने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा काठाला सतावणारा महापुराचा प्रश्न कायमचा संपविण्यासाठी नोव्हेंबर मध्ये केंद्रीय जल आयोगासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन का सुप्रियाताई सुळे यांनी कृती समितीला दिले आहे. या बैठकीत सादर होणाऱ्या कृती समितीच्या आराखड्यावर चर्चा होणार असून, यावर सकारात्मक निर्णय झाला तर या परिसराला भेडसावणारा महापुराचा प्रश्न कायमचा संपुष्टात येऊ शकतो. यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या बैठकीकडे सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.