| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ सप्टेंबर २०२४
सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली. सहकारी संस्थामुळे सामान्य शेतकरी व कष्टकरी वर्गाला आर्थिक बळ मिळाले. आमदार, खासदार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, राज्यातील सहकार नेते म्हणून त्यांनी खूप मोठे काम केले आहे असे उदगार ॠतुराज पाटील यांनी काढले.
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे सांगली काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने सहकार तपस्वी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्व. गुलाबरावजी पाटील यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या मनोगतात बोलताना ऋतुराज पाटील म्हणाले की, स्व. गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यसभेत पोटतिडकीने बाजू मांडली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस सेवा दलाने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात. त्यासाठी मा. पृथ्वीराज पाटील यांच्या कुटुंबियाकडून लागेल ती मदत आम्ही करण्यास तयार आहोत. सुरुवातीस गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.
शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दहा वर्षांमध्ये सांगलीमध्ये काँग्रेसचा विचार पोहोचवण्याचे काम अत्यंत तडफेने चालू केलेला आहे. त्यांचा गेल्या वेळी अगदी निसटता पराभव झाला. परंतु त्यांनी खचून न जाता पक्ष कार्यास वाहून घेतले आहे आज सांगलीच्या जनतेसाठी एक मिशन घेऊन ते चालले आहेत. त्यांना विधानसभेमध्ये संधी मिळाल्यास, सांगलीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांच्याकडून घडेल. त्यांना आपण सर्वांनी साथ देऊया, असे आवाहनही ऋतुराज पाटील यांनी केले.
डॉक्टर प्रतापराव भोसले यांनी ' गुलाबराव पाटील यांच्या संबंधी आठवणी सांगून त्यांच्या कुटुंबाशी असलेले नाते सांगून, त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, प्रदेश संघटक सचिव पैगंबर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमुरे यांनी केले व शेवटी आभार अरुण पळसुले यांनी मानले.
यावेळी ओबीसींचे अशोक सिंग राजपूत, इंटक युनियनचे डी. पी बनसोडे, नामदेव पठाडे, विश्वास यादव, श्रीधर बारटक्के, रघुनाथ नार्वेकर, अशोक मालवणकर, अरुण गवंडी, सौ प्रतीक्षा काळे, प्रकाश माने, बापू गोंडा पाटील इ. मान्यवर व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.