Sangli Samachar

The Janshakti News

खासीयत मारुती रोडची !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ सप्टेंबर २०२४
सांगलीचे तत्कालिन माजी जिल्हाधिकारी श्री. रत्नाकर वाघ यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाची बातमी वाचली. आणि त्यांनी सांगली शहरातील मारुती रोड रुंदीकरणाची धाडसाने केलेली मोहिम आठवली. रुंदीकरणानंतरही आज ४०-४५ वर्षं झाली. सांगलीचा मारुती रोड स्वत:चे महत्व तसेच राखून आहे.

कोणत्याही धर्माचे, वंशाचे, जातीचे सण, उत्सव, या लाडक्या मारुती रोडवरुन खरेदी केल्याशिवाय पूर्णत्वालाच येऊ शकत नाहीत. अगदी संक्रांतीचा तिळगूळ, चैत्र पाडव्याच्या साखरेच्या माळा, गणपतीमूर्ती, त्याची आरास, इतकंच काय नवरात्रीच्या घटस्थापनेला लागणारी काळी माती असो किंवा वटपौणिमेच्या पूजेसाठी वडाची छोटी फांदी असो, या सर्वांसाठी मारुती रोड हा सर्वांना हवाहवासा वाटत आला आहे. उपनगरांत कितीही मोठे सुपर बझार असले तरी 'कांही तरी अडतं ते मारुती रोडवरंच मिळतं' अशी आश्वासक निष्ठा समस्त सांगलीकरांचीं झाली आहे.

या मारुती रोडने मोठ्या दुकानांपासून, भाजीवाले, हातगाड्या, पथारीवाल्यांपर्यंत सर्वांनाच सामावून घेतले आहे. कोणतीही मिरवणूक, कोणतीही प्रचार फेरी, कोणताही मोर्चा या रस्त्यावरुन गेल्याशिवाय त्याला पूर्णत्व येऊच शकत नाही असा समज दूढ झाला आहे. १९८१ साली तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. रत्नाकर वाघांनी मूळात तीस फूट असणाऱ्या रस्त्याचं धडाक्यात रुंदीकरण केलं आणि प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळं आजही मोठं होण्यातलं दुःख, वेदना नागरिकांबरोबर मारुती रोडही भोगू लागला आहे.


रुंदीकरणापूर्वी बसकी असणारी दुकानं आता २-३ मजली झाली. एक-दोन मोठी कॉम्प्लेक्स झाली. आनंद चित्र मंदिर हे असेच या मारुती रोडचे भूषण ! मराठी चित्रपटांच्या प्रेमातून मराठी मन बनवायला- घडवायला मोठा हातभार 'आनंद'ने लावला, पत्र्याच्या शेडवजा असणारं थिएटर मारुती रस्त्याचं बदलतं रूप पाहून स्वतःही आधुनिक बनलं आणि रोडवरील अनेकांना उपजीविकेचं साधन मिळालं. आज ते मराठी चित्रपटांसाठी हक्काचं ठिकाण बंद आहे याची चुटपुट प्रत्येकाला आहेच.

मारुती रोडचं रुंदीकरण झालं तरी अजूनही कांही जुन्या आठवणी मनांत घर करुन आहेत. आताच्या आपटे फूलवाले यांच्या जवळ असणारा 'दावलमलिक दर्गा', त्याच्या शेजारी असणारे १००-१५० वर्षांपूर्वीचे भले मोठे चिंचेचे झाड हे प्रकर्षाने आठवते. खरं तर दावलमलिक दर्गा एक सामाजिक ऐक्याचं प्रतीकंच म्हणावं लागेल, चैत्र पाडव्याला तेथे मोठा उरुस भरायचा. सलग पाच-सहा दिवस विविध कार्यक्रम उत्साहाने साजरे व्हायचे, शर्यती, कुस्त्या, बँडवाल्यांच्या स्पर्धा, शाहिरांच्या स्पर्धा, सनई-ताशाची जुगलबंदी, गायन-वादनाचे कार्यक्रमही असायचे बाळ कारंजकर, अरविंद फडके, सदाशिवराव जाधव, बाळकृष्णबुवा बुट्टे, आण्णासाहेब दिवाण, हरिश्चंद्र कोकरे, राजेंद्र कानिटकर, शाहिर विभूते, शाहिर ओतारी अशा नामांकितांची सेवा या दावल मलिक दर्ग्याच्या उरुसानिमित्त रूजू व्हायची. लिसा साखर आणि नारळ या बक्षिसांवर इर्षेने लहान मोठ्या कुस्त्या रंगायच्या. अथणी, बेळगांव, चिकोडी, मिरज, आणि नामांकित प्रभात बँड कंपनी यांच्यात बँडच्या स्पर्धा घडायच्या. सर्व जाती धर्माचे, लहान-मोठे या उरुसात सामिल व्हायचे. दर्ग्यात मलीदा द्यायचे. आम्हीही उरुसावेळी उत्साहाने दर्ग्यात जात असू, कार्यक्रम ऐकत असायचो. दावलमलिका बाहेर 'खैरात' मागणारे फकीर मोरपिसांचा मारिचा डोक्यावरुन फिरवतांना मन बहरुन जायचं. धूपाच्या वासानं संपूर्ण परिसर प्रसन्न व्हायचा.

या मारुती रोडवर असणाऱ्या दावलमलिक दर्ग्याचे बाहेर चिंचेच्या मोठ्या झाडाखाली सिकंदर मुजावरांचे गाण्यांच्या पुस्तकांचे दुकान असायचे. ही जागा म्हणजे कानतृप्तीचे आणि विसाव्याचे ठिकाण बनले होते. जुन्या गाण्याच्या रेकॉर्डसचा प्रचंड साठा, सिकंदर मुजावर यांना असणारी खूप मोठी हौस यातून स्टेरिओ संचाचे नावीन्य त्यावेळी सांगलीकरांना वाटायचे. गाणी ऐकत सिनेमाच्या गाण्याची पुस्तकं खरेदी विक्री व्हायची. तेथेच समोर सहकार वस्त्र भांडारात लग्नाच्या बत्यासाठी आलेली ३०-४० माणसं विस्तीर्ण चिंचेच्या झाडाखाली विसावायची. रस्तारुंदीत हा मारुती रोडवरील सामाजिक ऐक्याचं प्रतीक असणारा दावलमलिक दर्गा गेला.. आणि कांही महिन्यातच मारुती रोड वरुन जाणाऱ्या-येणाऱ्या, शिणलेल्या, थकलेल्या मनाला उभारी देणारे अनेक वर्षांचे साक्षीदार असणारे प्रशस्त चिंचेचे झाडही जमीनदोस्त झाले.

मारुती रोडवरील अनेक नाव घेता येतील अशी दुकाने काळाच्या ओघात कमी झाली. कांही बदलली. मारुती रोडवर प्रसिद्ध असायचे त्यात तात्या साळुंखे यांच्या 'मध्यंतर' हॉटेलमधील कढीवडा, 'आनंदाश्रम' मधील टी आर यांचे भडंग, आनंद टॉकीज जवळील पांगळा गवळ्यांची चवदार भजी, विजय कोल्ड्रींगची आईस कॅण्डी, सटाल्यांच्या 'स्वागत'मधील जिलेबी, डी. पी. परांजपे यांचे डायजेस्ट, पैलवान चंद्रकांत खेत्रे यांची मांसाहारी 'उत्कृष्ठ' खानावळ. आजही ही नांव वाचतांना डोळ्यासमोर चित्र उभारतं आणि तोंडाला खमंग चव जाणवते.

मारुती रोडवरुन चक्कर टाकली नाही अशी एकही व्यक्ती सांगलीत चुकूनही सापडणार नाही. मारुती चौकात आल्यावर नकळत मारुतीरायाला हात जोडले जातात. याच चौकात मा. आमदार पै. संभाजी पवार आप्पा यांचे हसरं दर्शन व्हायचं. पूर्वी वेशीबाहेर असणाऱ्या या मारुती देवळापासूनच पुढे सहा गल्ल्यांची' सहागली' स्थिरावली होती. अपभ्रंशान तिचे रुपांतर 'सांगली' झाले.

मारुती रोडवर खूप मोठी व्यापारी पेठ आहे, मोठ-मोठी दुकानं आहेत असं नाही. पण सर्वांनाच हा रस्ता आपला वाटतो. सांगलीच्या बदलत्या रूपाचा, बदलत्या संस्काराचा आणि संस्कृतीचा साक्षीदार म्हणून सर्वात वयस्कर रस्ता मारुती रोड म्हटलं तर ते गैर होणार नाही.