yuva MAharashtra बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर दिवाळीत कामगार मंत्र्यांच्या घरासमोर करणार शिमगा. - संतोष पाटील

बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर दिवाळीत कामगार मंत्र्यांच्या घरासमोर करणार शिमगा. - संतोष पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशनच्या (सीटू) वतीने कामगारांच्या मागण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या विजयनगर येथील ऑफिसवर इमारत व इतर बांधकाम कामगारांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नियोजन सीटूचे प्रदेश अध्यक्ष प्रा. बी.  जी. खाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी सरचिटणीस कॉम्रेड जालिंदर गिरी, कॉ. ओम पुरी, कोषाध्यक्ष सुवर्णा रेवले, उपाध्यक्ष संजय जाधव, कॉम्रेड उमेश देशमुख व श्रमजीवी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पाटील इत्यादी पदाधिकाऱ्यांसह राज्यातील असंख्य इमारत व इतर बांधकाम कामगार एकत्र आले होते.

यावेळी बांधकाम कामगार व इतर कामगारांना दिवाळीसाठी वीस हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, 2019 प्रमाणे साहित्य खरेदी योजना सुरू करावी व साहित्यासाठी दहा हजार रुपये द्यावेत, साठ वर्षावरील नोंदणीकृत कामगारांस दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन चालू करावी, सुरक्षा संच, भांडी संच देण्याऐवजी त्यांची असणारी किंमत कामगारांच्या खात्यावर जमा करावी, सर्व जिल्ह्यात मेडिक्लेम योजना चालू करावी, यामध्ये त्यांच्या आई-वडिलांचे नाव समाविष्ट करावे, राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगारांसाठी एक दवाखाना सुरू करण्यात यावा, घर बांधण्यासाठी साडेचार लाख रुपये मंजूर करावेत, बोगस कामगार नोंदणी रद्द करावी, मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांची नोंद करून त्यांना लाभ द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.


या मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर झाले. या ठिकाणी दिवसभर ठिय्या आंदोलन केले, यावेळी  शिष्टमंडळाने कामगार मंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून भविष्यात मागण्याचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासित केले. या वेळी श्रमजीवी कामगार संघटनेचे राज्यअध्यक्ष संतोष पाटील म्हणाले की, राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास, येत्या दिवाळीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या शंभर फुटी रोड, सांगली या निवासस्थानाच्या समोर शिमगा साजरा करणार असल्याचा इशारा दिला.

यावेळी अनेक जिल्ह्यातून आलेले शेकडो बांधकाम कामगार महिला व पुरुष उपस्थित होते. यामध्ये गजू पटेल, जावेद शेख, प्रकाश वाघमारे, कृष्णा कांबळे, अर्जुन सोळंके, नितीन भैरट, ज्ञानेश्वर आजबे, गणेश चौधरी, विश्वनाथ यादव, ज्ञानेश्वर शेळके, साबिर शेख, हनुमंत मोरे, मुस्तफा शेख, विनोद गंडले, संजय कसबे व इतर अनेक पदाधिकारी व हजारो कामगार बांधव महिला पुरुष उपस्थित होते. या सर्व कामगारांनी मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.