| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ सप्टेंबर २०२४
अजित पवार महायुतीत दाखल झाल्यापासूनच भाजप राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये -तू-तू मै-मै' सुरू आहे. दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतभेदाची ही दरी आणखीनच वाढताना दिसत आहे. याला कारण आहे ते, आमदारकीसाठी सुरक्षित मतदारसंघ... जिथे ज्यांची ताकद जास्त, गत वेळी ज्यांचा जिथे आमदार, तिथे यावेळी त्या पक्षाचा उमेदवार असं सूत्र महायुतीतील पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील पहिल्या बैठकीत झालेल्या चर्चेत सर्व मान्य झाले होते.
परंतु महायुतीमध्ये सर्वाधिक मतदारसंघांमध्ये जागा आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांच्या. आणि याच ठिकाणी भाजपाच्या दिग्गजांना विधानसभा निवडणूक लढवायच्या आहेत. आता हाच मुद्दा कळीचा ठरतो आहे. भाजपाच्या नेत्यांनी या 'इच्छुकांच्या गुडघ्याला बांधलेल्या मुंडावळ्या' काढून घेतल्याने, साऱ्यांचा तीळ पापड होतो आहे. याच कारणावरून काही इच्छुकांनी कमळ खाली ठेवून कुणी 'हात' तर कोणी 'तुतारी' हाती घेतली आहे.
याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, तिकिटासाठी पक्ष सोडून गेलेले सत्ता येताच पुन्हा माघारी येतील. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. महायुतीची ताकद मोठी आहे, कोणी काही म्हणो, कसलाही दावा करू परंतु विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच पुन्हा सत्तारून होईल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने कागलचे समरजीत सिंह घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकला आहेत तर, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, वडगाव शेरी येथील जगदीश मुळीक, अमळनेरचे शिरीष चौधरी, कोपरगाव चे विवेक कोल्हे, या दिग्गजांची भाजपामध्ये घुसमट वाढली आहे. लवकरच यापैकी अनेक जण भाजपा सोडून इतरत्र पर्याय शोधण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कुठल्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उभारणार, याची उत्सुकता राजकीय क्षेत्राला लागून राहिलेले आहे.