Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी साधला विविध घटकांशी संवाद !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ सप्टेंबर २०२४
शिक्षण हा मूलभूत हक्क असून प्रत्येक गट स्तरावर सर्व सुविधांनी युक्त आदर्श शाळा निर्माण करीत असतानाच नीट सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी शासकीय कोचिंग क्लासकरिता प्रयत्न करू अशी आश्वासन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सांगली येथे बोलताना दिले. विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर्स, सी. ए., ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांशी राधाकृष्णन संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सर्व मान्यवरांकडून समस्या,  विकास विषयक अपेक्षा व संकल्पना जाणून घेतल्या. यावेळी लोकप्रतिनिधींनी कांद्याचा अनिश्चित दर, निर्यात शुल्क आणि निर्यात बंदी, सामाजिक समीकरणे करताना आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आधी सह जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित मुद्दे मांडले. त्याचप्रमाणे सांगलीत मोठे उद्योग यावेत, आयटी पार्क निर्माण व्हावा ग्रामीण भागात एमआयडीसीचे जाळे तयार करण्यात यावे, उत्तम दळणवळणाच्या सोयी सुविधा मिळाव्यात, पुण्यासाठी ट्रेनची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळ मिळावे संस्कृती संवर्धन व पर्यटन वाढीस त्यामुळे चालना मिळेल अशी अपेक्षा विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.


उपस्थितांशी संवाद साधताना राधाकृष्णन पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीरांच्या प्रलंबित स्मारकाचे बांधकाम विविध वेळेत पूर्ण होण्यासाठी तसेच जिल्ह्यात परिपूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता प्रतिपादन करून ते म्हणाले की,  उद्योजक व वैद्यकीय क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नियोजनाची गरज आहे. क्रांतीसिंह नाना पाटील यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याबरोबरच, कायदा व सुव्यवस्था आदी प्रमुख विषयासह उद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, उद्योजकांच्या समस्या, पर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास, साहित्य, नाट्य, सामाजिक कार्य, कृषी, पर्यावरण, जलसंधारण आदी विषयातील मान्यवरांच्या अपेक्षा त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.

यावेळी पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे, आ.  आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत, यांच्यासह जिल्ह्यातील साहित्य, नाट्य, सामाजिक कार्य, कृषी, संगीत, चित्रकला, नृत्य, लोककला, क्रीडा, पर्यावरण, जलसंधारण, स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ मान्यवर, उद्योग, व्यवसाय, वैद्यकीय तसेच न्याय क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.