Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत रंगणार राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ सप्टेंबर २०२४
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली आयोजित पीएनजी महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २०२४ उद्या आणि परवा दिनांक १८ आणि १९ सप्टेंबर रोजी भावे नाट्यमंदिर सांगली येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धेमध्ये सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांमधून विविध महाविद्यालयांच्या १७ संघांनी सहभाग नोंदवला आहे. जिल्हाधिकारी राजा दयानिधी
आणि पी एन जी पेढीचे संचालक राजीव गाडगीळ आणि मिलिंद गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठीक ११ वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. 


स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून अल्पावधीत विद्यार्थी कलाकार आणि महाविद्यालयांच्या विश्वासास पात्र ठरलेली स्पर्धा म्हणून स्पर्धेचा नावलौकिक आहे. स्पर्धेच्या दरम्यान रसिकप्रेक्षकांना काही प्रश्न विचारले जातील. प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या काही भाग्यवान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू सुद्धा देण्यात येणार आहे. तरी सर्व एकांकिका पाहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सांगलीतील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नाट्यपरिषद सांगली शाखेचे अध्यक्ष डॉ. भास्कर ताम्हणकर आणि स्पर्धा समिती प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांनी केले आहे.