yuva MAharashtra तरुणांच्या कलेला सोन्याचा भाव यावा - मिलिंद गाडगीळ; पीएनजी एकांकिका स्पर्धेस उत्साहात सुरवात !

तरुणांच्या कलेला सोन्याचा भाव यावा - मिलिंद गाडगीळ; पीएनजी एकांकिका स्पर्धेस उत्साहात सुरवात !

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ सप्टेंबर २०२४
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली आयोजित पीएनजी महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेस सुरुवात झाली. दिनांक १८ आणि १९ सप्टेंबर रोजी भावे नाट्यमंदिर सांगली येथे एकांकिका स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांमधून विविध महाविद्यालयांच्या १७ संघांनी सहभाग नोंदवला आहे. पी एन जी पेढीचे संचालक राजीव गाडगीळ आणि मिलिंद गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना, मिलिंद गाडगीळ म्हणाले की, सांगलीची ओळख सांस्कृतिक जिल्हा म्हणून आहे. तिचा नावलौकिक जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आणि इथं सहभागी कलाकारांच्या कलेला सुद्धा सोन्याचा भाव' यावा. असे ते म्हणाले.


अध्यक्षीय मनोगत प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांनी व्यक्त करताना म्हणाले की, या महोत्सवात जास्तीत जास्त महाविद्यालयानी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. यावेळी प्रमुख मान्यवर, परीक्षक यांचा परिचय नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी करून दिला.

यावेळी परीक्षक रवींद्र देशपांडे ( पुणे ), सौ. अनुया बाम ( रत्नागिरी ), त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे डॉ. शरद कराळे, नियामक मंडळ सदस्य चंद्रकांत धामणीकर, मुकुंद पटवर्धन, यांच्यासह असंख्य रसिक प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह विशाल कुलकर्णी यांनी केले . सुरवातीला, प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांनी तर आभार उपाध्यक्ष सौ. अंजली भिडे यांनी मानले. या उद्घाटन प्रसंगी नाट्य परिषद शाखेचे संचालक सौ अपर्णा गोसावी सचिन पारेख प्रशांत गोखले कुलदीप देवकुळे नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.