Sangli Samachar

The Janshakti News

आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्याबरोबरच, सर्वमान्य उमेदवार देण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची सत्वपरीक्षा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघा एक महिन्याचा कालावधी राहिला असून, सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, सध्या शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडे तीन, भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी दोन, तर एक जागा (शिंदे) शिवसेनेकडे आहे. या सर्वच ठिकाणी विद्यमान आमदारांनी पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असतानाच, इतर इच्छुकांची ही मोठी संख्या आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांसमोर बंडखोरी रोखण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. ही एका दृष्टीने त्यांच्यासाठी सत्व परीक्षाच मानले जाते.

पलूस-कडेगाव, वाळवा, तासगाव-कवठे महांकाळ, मिरज येथील विद्यमान आमदारांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. मात्र सांगली, जत आणि शिराळा आणि खानापूर-आटपाडी या ठिकाणी भाकरी पलटण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात घालून ठेवले आहेत. प्रत्येकाचीच 'मला नाही तर तुलाही नाही' अशी भूमिका आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना बंडखोरी सतावण्याची चिन्हे दिसत आहेत.


सांगली जिल्हा हा पारंपरिक काँग्रेसचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गेली अनेक वर्षे येथे खासदारकीपासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत काँग्रेसचीच मांडीयाळी दिसून येत होती. परंतु सध्या राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष दुभंगले असून, काँग्रेस भाजपामध्येही गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळेल, त्यांना विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत कुरघोड्यांना सामोरे जावे लागणार आहे. आणि म्हणूनच सर्वच पक्ष जिल्ह्यात सक्षम उमेदवार देण्यासाठी धावाधाव करताना दिसत आहेत. उमेदवारीसाठी कुठल्याही नावाचा पर्याय शोधला तरी इतरांकडून धोका होण्याची शक्यता मोठी आहे. 

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार ? कोणाची ताकद मोठी ? कोण विधानसभेत जाणार ? याकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने हालचालींना वेगाला आहे. जिल्ह्यातील अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्याबरोबरच, प्रस्तावित कामांनाही गती देण्यासाठी विद्यमान आमदारांनी कंबर कसली आहे. तर इतर इच्छुक उमेदवारांनाही आपल्या गॉडफादरच्या माध्यमातून विकास कामासाठी निधी मिळवण्याकरिता प्रयत्न चालवले आहेत.

एकंदरीतच राजकीयदृष्ट्या सजग असणाऱ्या या जिल्हय़ातील मतदार नेमकी कोणती भूमिका घेणार ? कुठल्या पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात आपले मत टाकणार ? हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या महिला वर्गांना मोठे महत्त्व आले असून, सर्वच पक्ष त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देत आहे. यामध्ये महायुती आघाडीवर असली तरी, ऐन मतदानाच्या वेळी महिला मतदार कोणती भूमिका घेतात हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.