Sangli Samachar

The Janshakti News

शरीराने लहान, पण गुणांने महान शिक्षक ! (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १६ सप्टेंबर २०२४
सद्याच्या प्रचलित शाळा, कॉलेजमधून जे ज्ञान दिले जाते, ते माणसाला त्याच्या उपजीविकेसाठी आवश्यक व्यवसाय-नोकरी, आर्थिक व अन्य व्यवहार करण्यासाठी उपयोगी पडते. पण जीवन यशस्वी होण्यासाठी, ज्या गुणांची, मूल्यांची जोपासना करावी लागते, त्यांचे ज्ञान मिळवण्यासाठी मात्र माणसाला वेगळ्याच शाळा-कॉलेजांमध्ये दाखला घ्यावा लागतो. निसर्ग ही एक अशी शाळा आहे की ज्याच्या प्रत्येक लहान-थोर घटकापासून, अंशापासून माणसाला काही ना काही शिकता येते. 

सद्याच्या शाळा-कॉलेजमधील अभ्यासक्रम, पुस्तके जे ज्ञान देऊ शकत नाहीत ते जीवनाच्या अंतीम क्षणापर्यंत आपल्याला निसर्गातून शिकता येते. निसर्ग शाळेच्या अभ्यासक्रमाला काळ-वेळेचे बंधन नाही. निसर्गातील प्रत्येक घटक, प्रत्येक अंश, सूर्य, चंद्र, आकाश, हवा, पाणी, जमीन, नद्या, पक्षी, प्राणी, किटक, डोंगर, पर्वत या सर्वांमध्ये एक किंवा अधिक असे गुण, मुल्ये असतात की ज्यांचा अभ्यास करून आणि त्या गुणांना आपल्या दैनंदिन आचरणात आणुन माणुस आपल्या जीवनाचा स्तर उंचाऊ शकतो, समृद्ध करू शकतो.

निसर्ग शाळेचे वर्णन करतांना सर जॉन लब्बोक-१ म्हणतात, “Earth and sky, woods and fields, lakes and rivers, the mountain and the sea, are excellent school masters, and teach some of us more than we can ever learn from books. पृथ्वी आणि आकाश, जंगले आणि शेते, तलाव आणि नद्या, पर्वत आणि समुद्र हे उत्कृष्ट शालेय शिक्षक आहेत आणि आपल्यापैकी काहीना आपण जे पुस्तकांमधून कधीही शिकू शकत नाहीत त्यापेक्षा जास्त शिकवतात.” 


पण संगणक, इंटरनेट, आर्टीफिशल इंटिलन्सच्या या युगातील माणसाचे जीवन इतके धावपळीचे, धकाधकीचे, ताण-तणाव, स्पर्धेचे बनलेले आहे की, रोजच्या व्यापातच त्याचे दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्षे निघून जातात आणि निसर्गाकडे पाहण्यास, त्याला जाणण्यास वेळ मिळत नाही. तरीही रोजचे दैनंदिन व्यवहार करतांना आपण थोडी जरी सजगता दाखविली, निसर्गातील लहान-सहान गोष्टींकडे थोडे लक्ष दिले, त्यातील घटकांची, अंशांची भाषा थोडे शांत बसुन, धीराने, नेटाने समजावून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला रोज आढळणा-या घरातील मुंगीपासूनही आपण खूप काही शिकू शकतो, ज्याचा फायदा आपल्याला आपल्या जीवनाचा स्तर उंचावण्यास, ते यशस्वी, सहज, सोपे बनविण्यास होऊ शकतो. 

प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक, लेखक, प्रेरक प्रवक्ता इम्यान्युअल जेम्स रोहन-जीम रोहन, आपल्या The Ant Philosophy मुंग्याचे तत्त्वज्ञान या लेखामध्ये मुंग्याच्या चार गुणांचे प्रामुख्याने वर्णन करताना सांगतातः 
“गेल्या कित्येक वर्षांपासून मी मुलांना एका साध्या पण शक्तिशाली संकल्पनेबद्दल - मुंग्याचे तत्वज्ञान, शिकवत आहे. मला वाटते की प्रत्येकाने मुंग्यांचा अभ्यास केला पाहिजे.“ 

मुंग्याचा पहिला गुण सांगताना जीम रोहन म्हणतात,
“मुंग्या कधीही माघार घेत नाहीत, अर्धवट सोडत नाहीत.“ मुंग्याचा हा गुण आपण आपल्या घरीही पडताळून पाहू शकतो. मुंग्याची रांग जर जात असेल तर तिला थोडा अटकाव करा, अडथळा करा आणि पाहा. कांही क्षणांसाठी त्यांची रांग विस्कळीत होईल, पण लगेचच त्या अडथळ्याला बाजूला करून किंवा दुसरा एखादा मार्ग शोधून त्यांची रांग पूर्वीप्रमाणे सुरू राहील. अडथळ्यांची, संकटांची, कठीण परिस्थितीची पर्वा न करता, माघार न घेता, त्यातून मार्ग काढण्याचा व पुढे वाटचाल करण्याचा मुंग्याचा हा गुण आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी आहे. 

आपल्या लेखामध्ये रोहन जीम मुंग्याचा दुसरा गुण सांगतात, 
”मुंग्या संपूर्ण उन्हाळ्यात हिवाळ्याचा विचार करतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्येच मुंग्या त्यांना हिवाळ्यामध्ये लागणारे आवश्यक अन्न गोळा करतात.” 
वेगळ्या शब्दांत, मुंग्या भविष्यकाळामध्ये लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, सामग्रीची तरतूद आधीच करून ठेवतात. माणसाला मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, घरातील वृद्धांचे व स्वतःचे, पती-पत्नीचे आजारपण, नोकरी व्यवसायातील बेकारी, मंदी, अशा कितीतरी कारणांसाठी भविष्यकाळात पैशाची गरज पडते. त्यामुळे भविष्यकाळात लागणाऱ्या गरजेच्या आवश्यक वस्तुंची आधीच तरतूद करण्याचा मुंग्याचा हा गुण माणसांच्यासाठी खुप महत्वाचा आणि उपयोगाचा आहे. 
 
(थोडेसे विषयांतरः भविष्यकाळामध्ये प्रिय व्यक्तिची ज्यावेळी कायमची ताटातूट होते त्यावेळी वैफल्यग्रस्त होऊन माणूस अध्यात्माकडे वळतो हे जर खरे असेल तर आधीच ज्यावेळी सर्व सुरळीत आहे, मन आनंदी आहे त्या वेळीच मन, विचार परमेश्वराकडे, अध्यात्माकडे वळविणे योग्य नाही कां?)   

मुंग्याचा तिसरा गुण वर्णन करताना रोहन जीम म्हणतात, 
”मुंगी तत्त्वज्ञानाचा तिसरा भाग म्हणजे मुंग्या संपूर्ण हिवाळ्यात उन्हाळा विचार करतात. हिवाळ्यामध्ये मुंग्या आपल्या वारूळात राहतात, बाहेर येत नाहीत. पण कांही कालावधीने मुंग्या वारूळाच्या बाहेर येतात. वारूळाच्या बाहेर आल्यानंतर हिवाळा संपलेला नाही असे जर त्यांना वाटले, जाणवले तर मुंग्या लगेचच आपल्या वारूळात परततात. पण हिवाळा संपल्याच्या पहिल्याच दिवशी वारूळाच्या दिवशी बाहेर येतील.”      

हिवाळा कधी ना कधी संपून परत एक वेळ उन्हाळा येणार, परिस्थिती बदलणार, संकटे, कठीण परिस्थिती फार काळ राहणार नाही, चांगले दिवस परत येणार, जगण्यासाठी खूप महत्वाचा असा आशावाद, होकारार्थी दृष्टिकोनाचा संदेश मुंग्या आपल्या वागण्यातून माणसाला देतात. 

रोहन जीम मुंग्याचा चौथा गुण सांगतात, 
”मुंगी हिवाळ्याच्या तयारीसाठी उन्हाळ्यात त्यांना जितके शक्य आहे तितके गोळा करतात.” मुंग्याचा हा गुण काय दर्शवितो? माणसांनी भविष्यकाळात उद्भवणा-या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी, त्याला जास्तीत जास्त जितकी करता येईल तितकी तरतूद करावी. मुंग्याचा हा गुण माणसांच्या खुप उपयोगाचा आहे कारण भविष्यकाळातील संकटात, कठीण परिस्थितीमध्ये कशाची व किती गरज लागणार हे माणूस आधी जाणू शकत नाही, फार फार तर अंदाज करू शकतो. 

(पुन्हा थोडेसे विषयांतरः माझ्या ओळखीचे अर्थशास्त्राचे एक प्राध्यापक एप्रिल-मे महिन्यामध्ये कडाक्याच्या उन्हाळा असताना छत्री, पावसाळी बुट, स्वेटर, मफलर खरेदी करतात. आज कितीतरी लोक नोकरी-व्यवसायाच्या सुरवातीच्या काळामध्येच जीवन व आरोग्य विमा पॉलिसी घेतात, वृद्धावस्थेत उपयोगी पडावी यासाठी आर्थिक बचत करायला सुरूवात करतात. या सर्वांमागील उद्देश भविष्यकाळासाठी पैशाची बचत, आर्थिक तरतूद हा जरी असला तरी सर्वच गोष्टी विशेषतः पती-पत्नी, मुले-मुली, सुना-जावई, नातेवाईक, मित्र, शेजारी यांचे प्रेम, माया, सहानुभुती, सहकार्य, समजदारपणा पैशाने विकत घेता येत नाहीत. हे जर खरे असेल तर आधीपासुनच या सर्वांशी प्रेमाने, मायेने, सहानुभुतीने, सहकार्याने, समजुतीने वागणे गरजेचे नाही का?)  

रोहन जीम यांनी मुंग्यांचे वरीलप्रमाणे चार गुणांचा निर्देश केला आहे पण मुंग्यांच्या जीवनपद्धतीत इतर किती तरी असे गुण आहेत, ज्यांचा अभ्यास मनुष्याला आपले जीवन आनंदी, यशस्वी, सहज, सुरळीत होण्यासाठी करता येईल. 

१) वैयक्तिक एकटी मुंगी ही लहान असते, पण ती जेव्हा समुहात इतर सर्व मुंग्याच्या बरोबर असते तेव्हा अत्यंत बुध्दीमान बनून वागते. समुहातील मुंग्या कठीण, जटील स्वरूपाची कार्ये सहज करतात. 
२) मुंग्यांची कोणत्याही कामाची कार्यप्रणाली सहज, सोपी असते व ते ती अत्यंत कुशलतेने हाताळतात. 
३) मुंग्यांचा समूह एकदम नियमबद्ध असतो. त्यांच्या जगण्यात तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापकीय कौशल्य असते. 
४) मुंग्या अत्यंत विकसित आणि सुलभ पद्धतीने अन्न शोधतात आणि त्याची वाहतूक करतात.
५) मुंग्यांचा समूह एखाद्या मानवी मेंदूसारखाच सक्षम असतो. लवचिकता, कार्यक्षमता आणि स्वयंसंघटन या तीन गोष्टींच्या बळावर मुंग्यांचं जग काम करतं. 
६) मुंग्या आलेल्या संकटांना, आपत्तीना सामूहिकरित्या न डगमगता, न घाबरता तोंड देतात. 
७) मुंग्या समाजप्रिय, कष्टाळू, हुषार व शिस्तप्रिय असतात. 
८) आपल्या आकारानुसार मुंग्या जगातील सर्वात मजबूत प्राणी आहेत. 
९) मुंग्या दिसताना जरी लहान दिसत असल्या तरी त्यांच्यामध्ये एवढी ताकद असते की, त्या आपल्या वजनाच्या ५० पट अधिक वजन उचलू शकतात. 
१०) मुंग्या वर्षातील ठराविक ऋतू मध्येच प्रजोत्पादनासाठी संयोग करतात. 
११) पृथ्वीवर मानवाचा उदय होण्या पूर्वीपासून मुंग्या पृथ्वीवर दीर्घ काळ टिकून राहिल्या आहेत याला कारण आहे, त्यांची परस्परांस संदेश पोहोचविण्याची पद्धती व श्रमविभागणी. 

आता समारोपाचे कांही शब्द - निसर्ग व त्यातील हा एक लहान अंश मुंगी, यांचे हे पुराण सांगण्याचा एकच उद्देश आहेः श्री दत्तगुरूंनी जिथे निसर्गातील पृथ्वी, वायु, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, भ्रमर, मृग, मत्स्य, टिटवी, सर्प, कुंभारीण माशी व कोळी, यांच्या गुणांना आपले गुरू मानले होते, तर माझ्यासारख्या सामान्य माणसाने आपल्या ज्ञानाच्या मर्यादा ओळखून, विविध बहुमुल्य गुणांनीयुक्त अशा निसर्गातील या लहान अंशाचे, शरीराने लहान असलेल्या मुंगीच्या, एका महान शिक्षकाच्या जीवनाचा अभ्यास करून आपल्या जीवनाची वाटचाल केली, तर आपले जीवन आनंदी होण्यात मदत होईल, नाही का?