| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० सप्टेंबर २०२४
होणार होणार म्हणून गाजत असलेल्या चिंतामणी नगर उड्डाण पुलावरील एकेरी वाहतूक अखेर कालपासून उद्घाटनापूर्वीच सुरू झाली आहे. परंतु अद्यापही एकेरी वाहतूक सुरू होणाऱ्या या मार्गावरील मुरमीकरण आणि डांबरीकरणाचे काम अजूनही बाकी आहे. तरीही बऱ्यापैकी काम पूर्ण झाल्याने अखेर नागरिकांनीच या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली असून, ठेकेदार व रेल्वे प्रशासनाने याला मुकसंमती दर्शवली आहे.
मिरज पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर चिंतामणी नगर येथील उड्डाणपुलाची रुंदी वाढवण्यासाठी मे 2023 मध्ये हा संपूर्ण पूल पाडण्यात आला. वास्तविक जानेवारी 24 पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करावयाचे होते. परंतु पास मार्गाची मागणी झाल्याने तसेच पुलाचा खर्च वाढण्याबरोबरच पावसामुळे कामात व्यत्यय येत गेला व पुलाचे काम रेंगाळले. माधवनगर, बुधगाव सह उत्तरेकडील गावांना सांगली शहराशी जोडणाऱ्या हा संपर्क सेतू बंद झाल्याने व्यापारी, नागरिक तसेच वाहतूकदारांना मनस्ताप सहन करावा लागला.
हा रेल्वे उड्डाणपूल वेळेत सुरू व्हावा यासाठी नागरिक हक्क समिती बरोबरच इतर संघटनांनी आंदोलने केली. अगदी पूल पाडलेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, श्राद्धही घालण्यात आले. माजी आमदार व हिंदू एकटाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाला हंटरफोड आंदोलनाने इशारा दिला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी 30 सप्टेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
अद्यापही पुलावरून एका बाजूची लेन खडी टाकून पूर्ण असली तरी मुरमीकरण व डांबरीकरणाचे काम तसेच फुटपाथ व कठडा करण्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. तरीही सध्याची हलक्या वाहनांसाठीचे सुरू झालेल्या वाहतुकीमुळे मुरमीकरणावर दाब देण्यास मदत होणार आहे. जसजसे खड्डे पडतील तसे मुर्मे करण करण्यात येईल त्यानंतर 15 ऑक्टोबरला डांबरीकरणाच्या कामास सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु पूर्ण क्षमतेने दोन्ही लेन सुरू होण्यासाठी अजूनही महिन्यापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान पुलाची रुंदी 21.1 मीटर आहे, पूल संपल्यानंतर पुढील रस्ता हा त्यामानाने अरुंद असल्याने, रस्त्याचेही रुंदीकरण करावे लागणार असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मार्गास अडथळे ठरणाऱ्या येथील तीन चिंचेची झाडे पाडण्यात येणार असून पैकी एक झाड पाडण्यात आले आहे. या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.