yuva MAharashtra नवख्या शिल्पकाराला शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम देणे चुकीचेच, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा घरचा आहेर !

नवख्या शिल्पकाराला शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम देणे चुकीचेच, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा घरचा आहेर !


| सांगली समाचार वृत्त |
मालवण - दि. २ सप्टेंबर २०२४
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर विरोधी पक्षाने शिंदे सरकारला धारेवर धरले आहे. काल महाआघाडीतर्फे मुंबई येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध शिवभक्तांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही टीका करून शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे.

राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या कोसळलेल्या स्थानास भेट दिल्यानंतर बोलताना रामदास आठवले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत
 राजकोट किल्ल्यावर घडलेली शिव पुतळ्याचे दुर्घटना दुःख व मनाला वेदना देणारी आहे. मात्र यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही. मात्र वादळात पुतळा पडला असता तर समजून घेता आले असते परंतु वाऱ्याने पुतळा पडला ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका पटण्यासारखी नाही. 


छत्रपतींच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचेच यावरून सिद्ध होते. देशात मोठमोठे शिल्पकार असताना एका नवख्या शिल्पकाराला पुतळ्याचे काम देणे ही मोठी चूकच होती. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य तो तपास होऊन यामध्ये दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करून मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ही रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांच्यासोबत यावेळी रायगड चे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.