| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने महिलांना खूष करण्यासाठी 'लाडकी बहीण योजना' सुरू केली. सांगली जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 28 हजार 160 महिलांनी ॲप आणि पोर्टलवरून अर्ज केले. पैकी काही महिलांना साडेचार हजार रुपये खात्यावर जमा झाले. या महिला खूष झाल्या. पण अद्याप दोन लाखाहून अधिक लाडक्या बहिणी ओवाळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज मोबाईल वर आला. परंतु त्यानंतर कोणतीच माहिती मिळायला तयार नाही. व पोर्टल बंद. ई-सेवा केंद्रातील व शासकीय कार्यालयातील गर्दीमुळे या महिलांना आपल्या अर्जाचे पुढे काय झाले हेच समजेनासे झाले आहे.
सुरुवातीस या योजनेच्या अंमलबजावणीत खूपच गोंधळ झाला. प्रथम ॲप व पोर्टलवरून महिलांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु अशिक्षित महिलांना हे अर्ज न भरता आल्याचे लक्षात आल्याने अंगणवाडी सेविकेकडून अर्ज भरून घेण्याची तरतूद करण्यात आली. परंतु या अंगणवाडी सेविकांना कोणतीही अधिकृत सूचना न मिळाल्याने, अंगणवाडी सेविका हा अर्ज भरण्यास टाळाटाळ करीत असतात. त्यातूनही 'दादा-बाबा' करून ई-सेवा केंद्रातून 7 लाख 28 हजार 160 महिलांनी अर्ज भरले. यापैकी 7 लाख 10 हजार 772 महिलांचे अर्ज मंजूर झाले. अर्ज मंजूर झालेल्या काही महिलांच्या खात्यावर तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये जमा झाले. तर काही महिलांच्या अजूनही बँक खात्यात रक्कम जमा झालेले नाही.
त्यामुळे या महिला नाराज असून, यापैकी काही महिलांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील महिला नेत्यांकडे तक्रार केली असून, या महिला नेत्यांनी आता आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्फत अद्यापही ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, ही माहिती पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या महिला आता आपल्या खात्यावर पैसे जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात लाडके बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याच्या तक्रारी वाढल्याने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्हाप्रमुखांना आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत 'कुटुंब भेट योजना' राबवण्याचे आदेश दिले असून, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत, अशांची माहिती संकलित करून, पाठवण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्या भगिनी आपल्या खात्यावर कधी पैसे जमा होणार या प्रतीक्षेत आहेत.