yuva MAharashtra हिंदू-मुस्लिम साहित्याची परंपरा जपणाऱ्या गोटखिंडीतील मशिदीमध्ये पारंपारिक वाद्याच्या निनादात गणेशाची प्रतिष्ठापना !

हिंदू-मुस्लिम साहित्याची परंपरा जपणाऱ्या गोटखिंडीतील मशिदीमध्ये पारंपारिक वाद्याच्या निनादात गणेशाची प्रतिष्ठापना !


| सांगली समाचार वृत्त |
गोटखिंडी - दि. १० सप्टेंबर २०२४
44 वर्षे सातत्याने प्रतिवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा यंदाही वाळवा तालुक्यातील गोटखिंडे गावाने जपली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षण श्रीकृष्ण कटकधोंड, सहाय्यक निरीक्षक सत्यजित आवटे, सहाय्यक निरीक्षक संतोष यादव, दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठान करण्यात आली. तेव्हा गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला.

गणपती प्रतिष्ठापना करण्याचे हे 44 वे वर्ष आहे. या प्रथेची सुरुवात 1980 साली येथील झुंजार चौकातील रिकाम्या जागेमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. त्यावर्षी पावसाचे प्रमाण खूपच जास्त होते. त्यामुळे मूर्ती कोठे स्थापन करायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा मुस्लिम समाजाच्या प्रमुख मंडळींनी या ठिकाणच्या मशिदीमध्ये गणपती स्थापन करण्याचे आवाहन केले आणि हिंदू समाजाने प्रथमच मशिदीमध्ये गणपती प्रतिष्ठापित केला. तेव्हापासून येथील मशिदीत सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते.


यासाठी हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन सकाळ संध्याकाळची आरती करीत असतात. गोटखिंडी येथील हे परंपरा सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. न्यू गणेश मंडळाने गणपती उत्सवाच्या निमित्ताने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षरोपण यांचा समावेश आहे.

यंदाच्या श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके, सचिव राहुल कोकाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात, अर्जुन कोकाटे, ठिबक सिंचनचे प्रवर्तक विनायक पाटील, जालिंदर थोरात, सचिन रियाज मुलाणी, प्रशांत थोरात, रोहन थोरात, हनुमंत जाधव, सचिन शेजावळे, सनी थोरात, आदित्य महाजन, सचिन पेटकर, पिंटू महाजन, संदीप शिंगटे, इलाही पठाण, प्रमोद स्वामी यांच्यासह गोटखिंडी व परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.