yuva MAharashtra महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनवण्याचा फॉर्म्युला ठरला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली माहिती !

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनवण्याचा फॉर्म्युला ठरला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली माहिती !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ सप्टेंबर २०२४
एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या महिलांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनातून महायुतीने प्रयत्न सुरू केले आहेत. मध्यंतरी भाजपानेच केलेल्या सर्वेतून महायुतीला विजय सोपा नसल्याची बाब उघडकीस आली होती. त्यामुळे महायुती सतर्क झाली असून जागेच्या वाटपाबाबत सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जवळपास 200 च्या दरम्यान जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमत झाले असून उर्वरित जागांवर चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर महाआघाडीनेही जागा वाटपात मोठी आघाडी घेतली असून, एकसंघपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून, आपापसात पाडापाडीचे राजकारण न करता महाआघाडीतील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ताकदीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


परंतु मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घेऊनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या निर्णयावर ठाकरे गट अजूनही आग्रही आहे. त्यामुळे महाआघाडीत बिघाडी होऊ नये, यासाठी महाआघाडीतील वरिष्ठ नेते प्रयत्न करीत आहेत. ठाकरे गटाला उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवायचे आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर घटक पक्षांना ही बाब मान्य नाही. त्यामुळे हाच मुद्दा कळीचा ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी चर्चा करताना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला पूर्णविराम देत, 'विधानसभेत ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री' हा फॉर्म्युला पक्का झाल्याचे सांगितले आहे. महाआघाडीने जागा वाटपातही सामंजस्याची भूमिका घेत, दगाफटका न करता ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार केला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.