yuva MAharashtra बॅंक खात्यावर जमा झालेले सात लाख रुपये परत केले, सांगलीतील छायाचित्रकार रवी काळेबेरे यांचा प्रामाणिकपणा !

बॅंक खात्यावर जमा झालेले सात लाख रुपये परत केले, सांगलीतील छायाचित्रकार रवी काळेबेरे यांचा प्रामाणिकपणा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ सप्टेंबर २०२४
सध्या ऑनलाईनच्या फसवणुकीद्वारे बँक खाते रिकामे झाल्याच्या घटना आपण पाहतो. पण एखाद्याच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याची घटना तशी विरळच. आणि आपल्या खात्यात कोणाचे पैसे जमा झाल्यानंतर ते प्रामाणिकपणे परत करणे हे त्याहून विरळ... पण सांगलीतील मुक्त छायाचित्रकार रवी काळेबेरे यांनी आपल्या बँक खात्यात जमा झालेले सात लाख रुपये बँकेला परत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील मुख्य छायाचित्रकार रवी काळेबेरे यांच्या बँक ऑफ बडोदा मधील खात्यात सात लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. सुरुवातीस हा ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांना वाटले. परंतु त्याने बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेच्या शाखाधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर, बँक ऑफ बडोदा च्या बंगळूर शाखेतून चुकून ही रक्कम काळेभिरे यांच्या खात्यावर जमा झाल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे सात लाखाचा चेक शाखाधिकाऱ्यांच्याकडे दिला. याबद्दल बंगळुरू शाखेकडून त्यांचे अभिनंदन करण्याचे पत्र पाठवण्यात आले. त्यांचे कौतुकही केले.


ही माहिती मिळताच सराफ कट्ट्यातील त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपच्या किसान शाखेचे प्रदेशाध्यक्ष पै. पृथ्वीराज भैया पवार यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी सराफ समितीचे अध्यक्ष जितेंद्र पेंडूरकर, भाजप नेते पृथ्वीराज पवार, रवी यांच्या मातोश्री विमल, सुनील पिराळे, सुधाकर नार्वेकर, सावकार शिराळे, गजानन पोतदार, चंद्रकांत मालवणकर, सुरेश जाधव, राजू कासार, संजय काळेबेरे, संजय मोहिते, विनायक साळुंखे, अशोकराव मालवणकर, बळीराम महाडिक, अशोक बेलवलकर आदी उपस्थित होते.