| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ सप्टेंबर २०२४
शासनाने कत्तलखाना परिसरात मराठा समाजातील वस्तीगृहासाठी जी जमीन दिलेली आहे, ती काही समाजकंटक व लोकप्रतिनिधी मिळून हडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा स्वराज्य संघटनेतर्फे करण्यात आला असून ही जमीन तात्काळ मराठा समाजास परत करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव साळुंखे यांनी दिला आहे.
याबाबतचे एक निवेदन मराठा स्वराज्य संघटनेचे महादेवराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना दिले आहे. यावेळी अधिकराव पाटील, उमाकांत कार्वेकर, सर्जेराव पाटील, फत्तेसिंह राजेमाने, सुधीर चव्हाण आणि मान्यवर उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली कत्तलखाना परिसरातील जागा मिळण्याबाबत मागणी केली होती. वसतिगृह तसेच मल्टीपर्पज हॉल, सुसज्ज वाचनालय, अभ्यासिका, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी ही जागा शासनाने प्रस्तावित केली आहे. मात्र हा प्रस्ताव मंत्रालयात सहा वर्षे धूळ खात पडला आहे. 2021 मध्ये काही एजंट या जागेची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने तयारीत असताना तेथे लावलेल्या फलकाबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे मराठा स्वराज्य संघाच्या वतीने तक्रार केली होती. त्यावर तत्कालीन अप्पर तहसीलदार डॉ.अर्चना पाटील यांच्या आदेशानुसार फलक त्वरित काढून त्यावर कार्यवाही केली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे, संबंधित जागा काही समाजकंटक तसेच लोकप्रतिनिधी स्वत:च्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत अशी तक्रार करून, तसा प्रयत्न झाल्यास झाल्यास मराठा समाज कायदेशीर मार्ग अवलंबेल व वेळ पडल्यास आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.