| सांगली समाचार वृत्त |
कागल - दि. ४ सप्टेंबर २०२४
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या 'करेक्ट कार्यक्रमाबाबत' केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. याचा फटका विरोधी पक्षाच्या उमेदवारांनाच नव्हे तर स्वपक्षीयांनाही यापूर्वी बसला असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर कागलचे भाजपवासी शाहू ग्रुपचे अध्यक्ष श्री. समरजीत घाडगे यांनी काल मा. शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी कागल येथील गैबी चौकातील सभेत ते बोलत होते.
एकसंघ राष्ट्रवादी पक्षात असताना विद्यमान मंत्री व कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ व जयंत पाटील यांचे सख्ख्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. यांच्या मैत्रीतील अनेक किस्से कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठे ताकद लावली होती, त्यामुळे समरजीत घाडगे यांना पराभवाचा धक्का बसला होता.
याच निवडणुकीचा संदर्भ देत समरजीत घाडगे म्हणाले की, मागच्यावेळी याच गैबी चौकातून जयंत पाटील यांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. त्यामुळे यावेळी याच चौकात माझ्या प्रचारार्थ शेवटची सभा घेऊन त्यांचाच 'करेक्ट कार्यक्रम' करायचा आहे, असा चिमटा घाडगे यांनी जयंत पाटील यांना काढल्यानंतर उपस्थित होते हास्याचे फवारे उडाले.
जयंत पाटील यांचे कोल्हापूर जिल्ह्यात, विशेषतः कागल तालुक्यात मोठे ताकद आहे. त्यामुळे ते यावेळी पूर्ण ताकदीनिशी समाजात घाडगे यांच्या पाठीशी उभे राहतात की, मैत्रीला जागत 'करेक्ट कार्यक्रम' करतात, याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
समरजीत घाडगे ही गेली दहा वर्षे भाजपमधून कार्यरत आहेत. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते इच्छुक होते. परंतु भाजपने त्यांची उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होऊन राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील नामवंत मान्यवरांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यात त्यांचे उठबस असते. या पार्श्वभूमीवर घाडगे हे हसन मुश्रीफ यांच्यासमोर कसे आणि किती आव्हान उभे करतात, हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच दिसून येईल. परंतु तोपर्यंत चर्चा होणार आहे ते जयंत पाटील यांच्या 'करेक्ट कार्यक्रमाची'.