| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ सप्टेंबर २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी मंगळवारी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आणि जिल्हा भाजपात एकच हलकल्लोळ माजला. वास्तविक सुधीरदादांनी या निर्णयाची तयारी खूप आधीपासून केल्याचे समोर येत आहे. परंतु त्यांच्या या निर्णयामागे भाजपा अंतर्गत वाद की, भाजपाची रणनीती याबाबत अनेक मतमतांतरे आहेत.
राष्ट्रीय भाजपाने त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण धुरा विद्यमान उपमुख्यमंत्री व भाजपाचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर दिली असले तरी, श्री. विनोद तावडे यांच्यावरही महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मध्यंतरी श्री. तावडे यांनी सांगली दौरा केला. आणि हाच दौरा आ. सुधीरदादांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयास कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे. या दौऱ्यात श्री. तावडे यांनी, जिल्ह्यात 'मराठा कार्ड' खेळण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सांगली विधानसभा निवडणुकीत भाकरी पलटणार असल्याचे संकेत मिळाले. आणि म्हणूनच भाजपाने अन्य उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच आ. सुधीरदादांनी स्वतः बाजूला होण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपाअंतर्गत असलेले उमेदवारीसाठीची चढाओढ. येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, माजी आमदार श्री. दिनकर तात्या पाटील, भाजपा किसान मोर्चाचे पै. पृथ्वीराज पवार, भाजप नेत्या निताताई केळकर या नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आ. सुधीरदादांना उमेदवारी दिलीच, तर श्री. डोंगरे यांनी बंडखोरीयाचेही तयारी केली आहे. आणि हाच मोठा अडसर आ. सुधीर दादांच्या विजयाआड येऊ शकतो.
तिसरे एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे मतदारात असलेली भाजपा बाबतची नाराजी. येथील संघ परिवार आणि मतदारांना भाजपाच्या सत्ताकारणातील मैत्रीचा विषय पचली पडलेला नाही. याची झलक नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आली होती. सांगलीमध्ये संघाचे ताकद मोठी आहे. जी लोकसभा निवडणुकीत अलिप्त राहिली होती. विधानसभा निवडणुकीतही याची पुनरावृत्ती झाल्यास त्याचा निवडणूक निकाल यावर परिणाम होऊ शकतो.
अशा संमिश्र कारणामुळे आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आ. सुधीरदादांचे समर्थक कार्यकर्ते अजूनही आशावादी असून, आगामी विधानसभा निवडणुकीत सुधीरदादाच उमेदवार असायला हवेत असा हट्ट धरला आहे. त्यामुळे आता मतदारांतही उत्सुकता आहे, येथे भाजपचा उमेदवार कोण ?