| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ सप्टेंबर २०२४
मिरज तालुक्यातील जुनी धामणी - इनाम धामणी - ते शंभरफुटी चौक या रस्त्याचे ७ मिटर रुंदीकरण करण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घातला आहे. आज या कामाचा शुभारंभ करणार असल्याचे समजताच सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मा. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भेट घेऊन अपूर्ण रुंदीकरणाचा काहीही उपयोग होणार नाही. या रस्त्यावरुन स्कूल बसेस, हाॅस्पिटलकडे जाणारी वाहने, वानलेसवाडी व मार्केट यार्डाकडून कोल्हापूर कडे जाणाऱ्या वाहनांची प्रचंड वर्दळ लक्षात घेता अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याचे १५ मिटर रुंदीकरण करण्याचा आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावा असे आवाहन केले असता, मा. कार्यकारी अभियंत्यांनी ७ मिटर ऐवजी १० मिटर रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले. परंतु पूर्ण रुंदीकरणाचे काम व्हावे व त्याची तपासणीही व्हावी. अन्यथा आम्हाला नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जनहित लक्षात घेऊन अपूर्ण रुंदीकरणाचे काम नाईलाजाने थांबवणे भाग पडेल, असा खणखणीत इशारा पृथ्वीराज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मारुती नवलाई, अनिल नांगरे, रविंद्र काळोखे, संतोष भोसले उपस्थित होते.
दरम्यान शंभर फुटी धामणी मार्गावर कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भरधाव धावणाऱ्या वाहनामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची कुचंबना होत आहे. त्याचप्रमाणे या मार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरून, मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. आणि म्हणूनच हा मार्ग प्रशस्त होणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या मागणीचे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या तसेच या परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पृथ्वीराजबाबा पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.