Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत भटक्या कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके, महापालिकेविरुद्ध सर्वत्र संतापाची लाट !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० सप्टेंबर २०२४
सांगलीतील संजय नगर परिसरामध्ये घराच्या अंगणात खेळणाऱ्या चार वर्षे वयाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केल्याने हा चिमुकला गंभीर जखमी झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हसनेन हैदरअली ताळीकोटी असे जखमी बालकाचे नाव असून, त्याला उपचारासाठी येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी केली येथील संजय नगर परिसरात जगदाळे प्लॉटमधील हसनेन हा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक येथील भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. आणि त्याच्या गालाचे, हाताचे व पोटाचे लचके तोडले. या प्रसंगाने घाबरलेल्या हसनेन याने जीवांच्या आकांताने आरडाओरडा केला. तेव्हा कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेतली आणि कुत्र्यांना दगड मारून हाकलून लावले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 


या घटनेमुळे मनपा विरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून संजय नगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, अनेकदा मोठ्या व्यक्तींच्या अंगावर ही कुत्रे धावून जात असतात. यापूर्वीही संजय नगर परिसरातील एका लहानग्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे त्याचप्रमाणे ताळीकोटी कुटुंबीयास वैद्यकीय व आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी होत आहे.