yuva MAharashtra कवठेमंकाळ तासगाव विधानसभा निवडणुकीत खा विशाल दादा पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम रोहित पाटील यांच्या पाठीशी ठाम !

कवठेमंकाळ तासगाव विधानसभा निवडणुकीत खा विशाल दादा पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम रोहित पाटील यांच्या पाठीशी ठाम !


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. ४ सप्टेंबर २०२४
स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे माझे लहान बंधू आहेत. त्यांच्या विचारानेच तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातील राजकारण होईल. त्यांना कोणताही त्रास होणार नाही. त्यासाठी आमच्याकडून योग्य पावले उचलली जातील, असे वक्तव्य माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. तर गडी कसा वागतो त्यावरून मालकाचा अंदाज करू नका. मालक चांगला आहे, असे विधान खासदार विशाल पाटील यांनी केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत खा विशाल पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम हे रोहित पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास राहुल गांधी येणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आ. डॉ. विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील तासगाव येथे आले होते. त्यांनी आमदार सुमन पाटील, युवा नेते रोहित पाटील यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्याबद्दल आ. कदम व खा. पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. या तक्रारीस उत्तर देताना आ. कदम व खा. पाटील यांनी वरील वक्तव्य केले.


काँग्रेसचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांची माजी खासदार संजय पाटील यांच्यासोबत सतत उठबस असते. महादेव पाटील यांनी नुकत्याच झालेल्या तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांच्या पॅनेलमधूनच निवडूनही आले आहेत. निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतर पाटील यांनी मार्केट कमिटीच्या कारभारावरून स्व. आर. आर. पाटील कुटुंब टार्गेट केले आहे. प्रामुख्याने आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांच्यावर सातत्याने तोफ डागत कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. 

बाजार समितीच्या नूतन इमारतीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार स्व. आर. आर. पाटील कुटुंबीयांच्या मर्जीने झाला आहे, अशी जहरी टीका पाटील यांनी सातत्याने केली आहे. शिवाय त्यांच्याकडून महाविकास आघाडीचा धर्मही पाळला जात नाही, असाही आरोप होत आहे.

महादेव पाटील यांच्याबद्दल तासगाव येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. पाटील यांच्याबद्दलची खदखद राष्ट्रवादीने रविवारी व्यक्त करून दाखवली. एका कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांच्यासमोर महादेव पाटील यांच्या विरोधातील तक्रारीचा पाढाच वाचूनच दाखवला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जर आम्हास मदत करत नसतील, ते विरोधकांच्या हातात हात घालून काम करत असतील, तर आम्ही काम कसे करायचे, वरिष्ठ म्हणून आपण याबाबतीत निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.

यावर बोलताना आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, आर. आर. पाटील व पतंगराव कदम यांचे राजकीय सख्य सर्वांना माहित आहे. ते दोघे एकमेकांचे लहान - मोठे भाऊ होते. रोहित पाटीलही माझा लहान भाऊ आहे. त्यांना तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात कोणताही त्रास होणार नाही. त्यांच्या विचारानेच या मतदारसंघातील राजकारण होईल. आपण ज्या तक्रारी केल्या आहेत त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. 

खालील. विशाल पाटील म्हणाले, गडी कसा वागतो त्यावरून मालकाचा अंदाज करू नका. मालक चांगला आहे.

काँग्रेस तालुकाध्यक्ष बदलाची चर्चा

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्या विरोधातील तक्रारीनंतर माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी तालुकाध्यक्ष बदलाचे संकेत दिल्याची चर्चा तासगाव तालुक्यात सुरू झाली आहे. यापुढील काळात रोहित पाटील यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यांच्या विचारानेच मतदारसंघाचे राजकारण होईल. यापूर्वी राजकीय दृष्ट्या तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात एका व्यासपीठावर येण्याचा फार योग आला नाही. मात्र यापुढे तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित पाटील यांचेच व्यासपीठ असेल. त्यांच्या समवेत आम्ही सर्वजण असू. आपल्या ज्या काही किरकोळ तक्रारी आहेत त्याबाबतीत बसून निर्णय घेऊ. त्या तक्रारींचे निरसन करू, असे सांगत अस्पष्टपणे तालुकाध्यक्ष बदलाचे संकेत उभयतांनी दिल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र रंगली आहे.