| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ सप्टेंबर २०२४
सांगली महापालिका क्षेत्रातील खड्डे मृत्युदूत बनत असून, याकडे पालकमंत्री, आमदार व माजी नगरसेवकांचे दुर्लक्ष नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्पुरते डागडुजी करीत हे खड्डे बुजवले खरे, परंतु पुन्हा एकदा या खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. परिणामी या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढल्या आहे इतकेच नव्हे तर कालच सांगली मिरज रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला याच खड्ड्यामुळे गमवावा लागला.
घामासान पावसामुळे सांगली महापालिका क्षेत्रात रस्त्यांची चाळण झाली आहे. वास्तविक खराब झालेल्या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी पक्के पॅचवर्क करण्याची गरज होती. परंतु निधीच्या कमतरताची कारणे देत प्रशासनाने हात वर केले. किंबहुना यात तात्पुरती डागडुजी करीत हात धुवून घेतल्याची तक्रार नागरिकातून करण्यात येत आहे. गल्लीबोळातील रस्ते मध्यंतरी हॉटमिक्स आणि काँक्रीटचे बनवण्यात आले. मात्र मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून, यावरील खड्डे अपघातास कारण ठरत आहेत. काही काही ठिकाणी तर अर्धा अर्धा फूट खड्डे दिसून येत आहेत. मात्र पालकमंत्री, व माजी नगरसेवकांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
आगामी विधानसभा व पाठोपाठ येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत नागरिक उमेदवारांना याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत असे बोलले जात आहे. परंतु तोपर्यंत रस्ते चक्काचक होऊन, मतदारांना भुलभुलैय्यात गुंतवले जाईल. मतदारा राजाही या चकव्यात अडकून आपली मते यांनाच दान करेल. गेले अनेक वर्षे हेच चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासन किंवा शासन निर्धास्त आहे. कोणालाच जनतेच्या सुखसोयीची पर्वा नाही. केवळ आपली पोळी भाजली, आपली तिजोरी भरली की, जनतेचे काहीही होवो कोणालाच याचे सोयरसुतक दिसून येत नाही. काही सामाजिक संघटनांनी आंदोलने केली, दंगा केला की, त्यांना गप्प करण्याचा 'इलाज' शोधला जातो. पुन्हा येरे माझ्या मागल्या. असेच चक्र सुरू असून मतदार जोपर्यंत आपल्या हक्कासाठी जागृत होत नाही तोपर्यंत असेच बळी जात राहणार हे नक्की.