| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ३ सप्टेंबर २०२४
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेने जन्म-मृत्यू विलंब शुल्कात थेट पाचपट दरवाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना हा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्याची मागणी मिरज सुधार समितीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या कडे केली आहे.
मिरज सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, सलीम खतीब यांच्यासह अन्य सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती पुर्णत: भिन्न आहे. मिरज शहरातील ८० टक्के रहिवासी हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहेत. मिरज हे वैद्यकीय शहर असल्याने दररोज अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे महापालिकेत जन्म व मृत्यूची नोंंद अधिक होत असते. जन्म व मृत्यूची वेळेत नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित व मध्यमवर्गीयच असतात.
महापालिकेने सर्वसाधारण प्रशासक सभा क्रमांक १८/२०२३-२४ सर्वसाधारण प्रशासक ठराव क्र.१०४/दि.१३/०३/२०२४ रोजीच्या ठरावात १ वर्षापुढील जन्म व मृत्यू नोंदणीकामी कोर्ट आदेश नंतर शुल्क १ वर्षापर्यंत १० रूपये व त्यापुढील प्रती वर्ष ५०/- रूपये केले आहे. दि.१३/०३/२०२४ रोजीच्या ठरावापूर्वी हा शुल्क १ वर्षापर्यंत मोफत व त्यापुढील प्रती वर्ष १०/- रूपये इतकी आकारले जात होते. महापालिकेने जन्म व मृत्यू नोंंदणी विलंब शुल्कामध्ये थेट पाचपट वाढ केल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने ही दरवाढ त्वरित रद्द करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे.