yuva MAharashtra अखेर चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूलावरील एकेरी वाहतूक 30 सप्टेंबर पासून सुरू होणार !

अखेर चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूलावरील एकेरी वाहतूक 30 सप्टेंबर पासून सुरू होणार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ सप्टेंबर २०२४
सांगली माधवनगर रोडवरील चिंतामणी नगर येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूल 30 सप्टेंबर पासून सुरू होण्याचा विश्वास, पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेश पाखरे यांनी व्यक्त केला असून, या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे पाखरे यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी पुलाचे 100 टक्के काम पूर्ण होईल असा अंदाज हे त्यांनी वर्तविला आहे.

रेल्वेचे दुहेरीकरण झाल्याने नवा रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यासाठी पश्चिमेशी गावांना सांगलीला जोडणारा हा सेतू जमीनदोस्त करण्यात आला. 10 जानेवारी 2024 पर्यंत हा पूल तयार करण्याचे कंत्राटदाराशी झालेल्या करारानुसार ठरले होते. परंतु या रेल्वे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण राहिल्याने विविध सामाजिक संघटनांनी वारंवार आंदोलने व मोर्चाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनावर हल्लाबोल केला होता. परंतु तरीही हा रेल्वे उड्डाणपूल तयार होत नव्हता. मात्र आता 30 ऑक्टोंबर पासून या रेल्वे उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा विश्वास पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेश पाथरे यांनी व्यक्त केल्याने या आंदोलनाला यश आले आहे असे म्हणता येईल.


सांगली ते माधवनगर रस्त्यावर चिंतामणीनगर येथे रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम १० जून २०२३ पासून सुरू झाले आहे. १० जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. या कालावधीत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मूळ रेल्वे पूल काढून तेथे नवीन रेल्वे पूल बांधण्यासाठी रेल्वेकडून १५ कोटी रुपयांची तरतूद होती. तोपर्यंत स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार दोन बोगदे आणि मूळ पुलाच्या रुंदीकरणाची राज्य शासनाकडून सूचना आली.

त्यानुसार वाढीव कामाचा आराखडा करण्यासह मंजुरी मिळण्यास दोन महिने काम थांबले. वाढीव काम १० कोटींपर्यंतचे झाले. या सर्व कारणांमुळेच रेल्वे पुलाच्या कामाला उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाचे मत आहे. सध्या ८० ते ८५ टक्के काम पूर्ण असून, ३० सप्टेंबरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होईल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रेल्वेच्या कामात कधीही दिरंगाई होत नाही, असा नागरिकांचा विश्वास आहे. याबद्दल रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिंतामणीनगर रेल्वे पूल काढणे आणि नवीन बांधण्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद होती. कामाला सुरुवात केल्यानंतर रुंदीकरण, दोन बोगद्यांमुळे काम थांबले. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाढीव काम १० कोटी रुपयांचे झाले. या मंजुरीची कागदपत्रे येणे आणि निधी मिळण्यात अडचणी झाल्यामुळे काम थांबले होते. वाढीव काम करण्यामुळे पुलाचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही, असे रेल्वे प्रशासनाचे मत आहे.