yuva MAharashtra कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील 181 वर्षाची परंपरा असलेल्या गरुड मंडपाची पुनर्बांधणी !

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील 181 वर्षाची परंपरा असलेल्या गरुड मंडपाची पुनर्बांधणी !



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २५ सप्टेंबर २०२४
कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर हे केवळ महाराष्ट्रातीलच भाविकांचे आराध्य. या मंदिराला साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणून मान्यता आहे. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या सभामंडपास गरुड मंडप म्हणून संबोधले जाते. या मंडपाला 181 वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. 1839 च्या दरम्यान हा मंडप बांधण्यात आला असून, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या मंडपाचे दुरुस्ती काम वेगाने सुरू आहे.

या गरुड मंडपात दर शुक्रवारी श्री महालक्ष्मी येथील सदरेवर स्थापित होते. शिवाय गणेशोत्सवात या ठिकाणी गणपती बाप्पांचीही प्रतिष्ठापना केली जाते मंदिर शास्त्रानुसार हा भाग मंदिराच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मंदिर परिक्रमा नंतर देवीची पालखी काही काळ विश्रांतीसाठी याच ठिकाणी थांबते. शिवाय मंदिरातील अनेक धार्मिक विधी येथेच संपन्न होतात. साधारण 1839 च्या दरम्यान हा मंडप उभा केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

करवीर छत्रपती संस्थानचे महत्त्वाचे अधिकारी पंडितराव यांच्या कारकिर्दीत देवीच्या सदरेवरील कार्यक्रम पार पडावा, म्हणून हा मंडप उभारण्यात आल्याची नोंद अंबाबाई मंदिराच्या इतिहासात आढळते. सुबक दर्जेदार नक्षीकामामुळे या मंडपाला देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी 48 खांब असून यात वीस फूट लांबी आणि 15 इंच बाय 15 इंच जाडीचे आठ मुख्य खांब आहेत.


सध्या येथील पुरातन गरुड मंडप पाडण्यात आला असून, त्याची पुनर्बांधणी सुरू आहे. मात्र नवीन मंडप पूर्वीप्रमाणेच सागवानी लाकडाचा वापर करून, हुबेहूब उभारला जात आहे. प्रतिवर्षी शारदीय नवरात्रोत्सवात या ठिकाणी विविध विधी पार पाडले जातात. यंदाच्या नवरात्र उत्सवात गरुड मंडपाचे प्रतिकृती उभारली जाणार असून याच ठिकाणी पार पडले जातील.