yuva MAharashtra वर्षभराची काळजी मिटली कोयना धरण 100 % भरले, मात्र संभावित पावसाने धकधक वाढली ! अलमट्टी हिप्परगी धरणाकडे सर्वांचे लक्ष !

वर्षभराची काळजी मिटली कोयना धरण 100 % भरले, मात्र संभावित पावसाने धकधक वाढली ! अलमट्टी हिप्परगी धरणाकडे सर्वांचे लक्ष !


| सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. १ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण हे केवळ महाराष्ट्राचे तहानच भागवत नाही तर राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते. सर्वात मोठा वीज निर्मिती प्रकल्प कोयना धरणावरच असून सातारा सांगली जिल्ह्यावर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी सध्या प्रसन्न झाली आहे. गेल्या दोन महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने कोयना धरण 100% भरले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी नुकतेच कोयना धरणाचे जलपूजन केले आहे. एकीकडे ही समाधानकारक बाब असली तरी संभावित चक्रीवादळामुळे विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोरदार बरसण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे कृष्णाकाठच्या नागरिकांची धकधक वाढवणारी ही बातमी आहे.

कोयना धरणामुळे राज्यातील कृष्णाकाठ सुजलाम सुफलाम झाला असून, येथील जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रात सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो. कोयना धरणातील जलसाठ्यामुळे, आगामी काळात केवळ शेती, उद्योगच नव्हे तर वीज निर्मितीची ही चिंता मिटली आहे. परंतु गेल्या आठवड्याभरात पावसाने घेतलेल्या उसंतीनंतर, तू पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. याचे कारण भारतीय किनारपट्टीला दोन्ही बाजूंनी गेलेले चक्रीवादळ हे आहे. यामुळे हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशावेळी कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागणार आहे. याच नवसर्गाच्या प्रमाणात कर्नाटकातील अलमट्टी धरणातून व हिप्परगी बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग झाला नाही, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा कृष्णा घाट पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी या दोन्ही धरणातील नवसर्गावर लक्ष ठेवण्याचे आवश्यकता वर्तवण्यात येत आहे.


या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यातच कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र शासनाला अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, दबाव आणण्याची मागणी केली होती.