| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १७ ऑगस्ट २०२४
लॉकडाऊनच्या काळातील ही घटना... सकाळी नेहमीप्रमाणे मी घरी खोलीमध्ये येरझा-या घालत होतो. मध्येच थोडे थांबून खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहत होतो. खिडकी लगतचे लाल फुलांचे झाड, त्या खाली टाकून दिलेले बांधकामाचे शिल्लक राहिलेले दगड, झाडाच्या फांद्यावरून चुं-चुं आवाज करत इकडून-तिकडे पळणा-या एक-दोन छोट्या खारी, खिडकीच्या कट्ट्यावर कधीतरी येऊन बसणारी कबुतरांची जोडी, बाहेरचे मोकळे मैदान. सगळे कांही नेहमीचेच आणि लॉकडाऊनच्या बंधनामुळे आलेल्या उदासपणाची भर. कशातही काडीचा फरक नाही.
पण आज सकाळी मात्र थोडे वेगळे घडले. झाडाखालील दगडामध्ये मला जरबेऱ्याचे एक फुल दिसले. ते टपोरे सुंदर फुल पाहता क्षणीच माझ्या मनाला भावले आणि मला खूप आनंद झाला. लगेचच त्या फुलाचा मी कॅमेराने फोटो काढला. -१ आणि कॅमेरा जागेवर ठेवण्यासाठी माघारी वळलो असता माझ्या कानांवर शब्द पडले,
“आहो, फोटोग्राफर शुक ... शुक .... थोड थांबा, कांही बोलायचं आहे तुमच्याशी”
कोण बोलत आहे मला समजेना.
“आहो... इकडे खालती, या दगडांमध्ये. तुम्ही नुकताच फोटो घेतला ना ते, मी जरबे-याचे फुल बोलत आहे. थँक्यू सो मच. तुमचे मनापासून आभार.”
माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. ‘हे कसे शक्य आहे ? फुल कधी माणसांशी बोलते कां ? बरं फुलं माणसांशी बोलतात, हे जरी मानलं तरी हे फुल माझे आभार कशासाठी मानत आहे?’
“तुमचा थोडा मोकळा वेळ बोलण्यासाठी दिलात तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो.” फुल म्हणाले.
“अरे बाबा, माझे सध्याचे वय आणि हा लॉकडाऊन, यांच्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळच वेळ आहे. टीव्हीवरील कंटाळवाणे कार्यक्रम बघत, इंटरनेटवर चॅटींग करत, अधूनमधून मित्र, नातेवाईकांशी मोबाईलवर दूर अंतरावरून तरी कां होऊना थोडावेळ बोलून कसातरी वेळ काढत आहे. आज कितीतरी दिवसांनी माझ्याशी तू प्रत्यक्षात बोलत आहेस. त्यामुळे खरं तर, मलाच तुझे आभार मानले पाहिजेत.”
त्या फुलाच्या प्रश्नाला उतर देत मी सांगितले.
“तुमच्या होकाराने मला खूप बरं वाटले. आता विस्ताराने तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो.“ फुल पुढे बोलू लागले.
“आम्ही फुले माणसाशी कसे बोलतो हे तूम्हाला जाणायचे आहे ना ? तर ऐका. निसर्गातील कोणतीही वस्तु, फुले, वेली, झाडे, वृक्ष, हा सूर्य, रात्री उगवणारा चंद्र, तारे, चांदण्या, हवेच्या मंद, शितल लहरी, पावसाच्या धारा, शिशिरातील थंडी, डोंगर, पर्वत, द-या, नद्या, समुद्र, पशु, पक्षी, किटक, अगदी दगड-धोंडेसुद्धा माणसाशी बोलू शकतात, त्यांच्याबरोबर गाणेसुद्धा गाऊ शकतात. पण त्यासाठी आवश्यकता असते फक्त एका गोष्टीची. एकमेकांच्या भावलहरी जुळण्याची. एकदा कां एकमेकांच्या भावलहरी जुळल्या की मग, ना भाषेची अडचण, ना शब्दांची गरज. माणूस एकदा का निसर्गाच्या जवळ गेला की त्याच्या व निसर्गातील सर्वांच्या भावनां जुळतात. ते सर्व एकमकांशी बोलतात, विचारांची आदानप्रदान करतात, आपले सुख-दुःख, वेदना-आनंद वाटतात. आपणा दोघांचे हे जे संभाषण सुरू आहे ते परस्परांच्या भावना जुळल्यामुळेच.“
फुले माणसांशी कशी बोलू शकतात हे स्पष्ट करून त्या जरबे-याच्या फुलाने आपले बोलणे पुढे सुरू ठेवले.
“आता मी तुमचे आभार कां मानले हे सांगतो. पण त्या पूर्वी फुलांचे जीवन, सृष्टीच्या निर्मात्यांने फुलांची निर्मिती करण्यामागील विशिष्ट उद्देश, फुलांच्या जीवनाचे उद्दीष्ट हे महत्वाचे मुद्दे समजाऊन घेऊ.
या सृष्टीच्या निर्मात्यांने ही सृष्टी आणि त्यातील सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या तरी विशिष्ट उद्देशाने निर्माण केल्या आहेत. आम्हा फुलांची निर्मिती मनुष्यांना आनंद देऊन, त्यांच्या दुःख-वेदनांचा भार कमी करण्यास मदत करावी यासाठी केली आहे. फुलांच्या निर्मितीचा उद्देश फुलांना पूर्ण करता यावा, यासाठी कांही फुलांना मोहक रंग, कांहीना सुगंध, तर कांहीना रंग व सुगंध या दोन्हींची देणगी दिली आहे.
फुलांना मिळालेल्या या देणगीमुळे आम्हा फुलांकडे पाहताना, सुगंध हृदयात साठवून ठेवतांना सर्वांना आनंद होतो. मी जे कांही सांगत आहे त्याच्या पुष्टीसाठी कांही उदाहरणे देतो.
या लॉकडाऊनच्या काळात किंवा कधीही तुम्हाला उदास वाटू लागले, नैराश्य किंवा क्रोध आला तर घरच्या बागेत-कुंडीत फुललेल्या जास्वंद, गुलाब, झेंडुच्या फुलाकडे कांही वेळ निरखुन पाहा. तुम्हाला अलर्जी नसेल तर पारिजातक-प्राजक्त, मोगरा, किंवा जाई-जुईच्या फुलांना आपल्या हाताच्या ओंजळीत घेऊन एक दीर्घ श्वास घेऊन त्यांचा वास घ्या किंवा लव्हेंडर, गुलाब फुलांच्या तेलाचे कांही थेंब गरम पाण्यात टाकून स्नान करा. तुमच्या मनातील नकारार्थी विचार, उदासिनता, क्रोध कमी होण्यास मदत होऊन तुम्हाला प्रसन्न, आनंद वाटु लागेल.”
मनातील नकारार्थी विचार, उदासिनता, क्रोध कमी करण्यासाठी सुगंध चिकित्सेवर आधारित उपाय सांगून ते जरब-याचे फुल पुढे सांगु लागले,
“पारिजातक-प्राजक्त, मोगरा, किंवा जाई-जुई सारखेच पण आकाराने त्यांच्यापेक्षा थोडे मोठे असणारे डचमन पाईप कॅक्टस, क्विन ऑफ नाईट, ऑर्चिड कॅक्टस या नांवानी ओळखले जाणारे निवडुंगाच्या जातीचे एक फुल आहे. कांही लोक याला ब्रह्मकमळपण समजतात. हे फुल फक्त पावसाळ्यात रात्री उमलते व तीन-चार तासात कोमजून जाते. पांढ-या शुभ्र रंगाची, पांढरी-पिवळसर केसर असलेली ही फुले दिसायला सुंदर असतातच पण, आपल्या सुगंधाने जवळपासचा सगळा आसमंत भारून टाकतात. सर्वांना आनंद देतात. त्यामुळे हे फुल उमलत असतांना लोक त्याचे फोटो काढतात, व्हिडीओ बनवतात, सोशल मिडीयावर प्रसिद्ध करून आपल्याला मिळालेला आनंद इतरांमध्ये वाटतात. -२
माणसां-माणसांमध्ये धर्म, जात, कातडीचा रंग, देहाचा आकार, देश-राज्याच्या सीमा असा कोणताही भेदभाव न करता आम्ही फुले सर्वांना सारखाच आनंद देत असतो. जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक हजारोंच्या संख्येने आमचे भाऊबंद असलेल्या साकुराच्या फुलांना-३ उमललेले पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी जपानला भेट देत असतात.
जपानी लोक या फुलांचा ऋतू सुरू होण्याची वाट उत्सुकतेने पाहात असतात. वर्षातुन एकवेळ, फक्त दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी फुलणा-या या फुलांचे सौंदर्य अप्रतिम असते. ही फुले बहरू लागली की सर्व लोक या फुलांना पाहण्यासाठी बागेत येतात. फुलांच्यासोबत फोटो-व्हिडीओ घेतात. त्यांच्या सान्निध्यात गप्पा मारतात.
सूर्यास्तानंतर योझाकुरा-४ म्हणजे रात्रीच्या वेळी फुले पाहण्याचा कार्यक्रमाला सुरूवात होते. हा कार्यक्रम म्हणजे आनंदोत्सव आणि फक्त आनंदोत्सव असतो. साकुराने बहरलेल्या बागेतील झाडांवर लटकवलेले कंदील पेटवले जातात. यावेळी बागेतील वातावरण अप्रतिम सौंदर्याने भारून जाते.
तुम्हाला एक गुपीत सांगतो. स्वर्ग कसा असतो हे या पृथ्वीवर तुम्हाला बघायचे असेल ना तर, साकुराची फुले, योझाकुरा पाहण्यासाठी जपानला मुद्दाम भेट द्या. अगदीच शक्य नसेल तर गुगलवर सर्च करून त्यांचे फोटो, व्हिडीओ पाहा. -५
या कांही उदाहरणावरून तुम्हाला समजले असेल की त्या जगन्नायकांने फुलांची निर्मिती माणसांना आनंदीत करण्यासाठी, त्यांच्या दुःख वेदनांचा भार कमी करण्याच्या उद्देशाने केली आहे. आणि या उद्देशाची पूर्ती आपल्या अल्प काळाच्या जीवनामध्ये करणे हेच फुलांच्या जीवनाचे उद्दिष्ट असते.
फुलांची निर्मिती, उद्देश, उद्दिष्ट सांगून आता मी तुमचे आभार कां मानले हे सांगतो.
काल संध्याकाळी एका व्यक्तिने आम्हा फुलांच्या दुकानदाराला पुष्पगुच्छ करण्याची ऑर्डर दिली. त्या दुकानदाराने सर्व फुलांतून सर्वात प्रथम माझी निवड केली. लाल रंगाची कांही गुलाबाची फुलेही घेतली. आता दुकानदाराचे हात एखाद्या कलाकारासारखे काम करू लागले. सर्वात प्रथम त्यांने आम्हा सर्व फुलांचे कमी-जास्त लांबीचे देठ तबल्यावर पडलेल्या थापेच्या आवाजाप्रमाणे आपल्या हातातील कात्रीचा खट्, खट्, खट्..... आवाज करत कापून समान लांबीचे केले. नंतर आमच्या देठाला असलेली अस्ताव्यस्त पाने सतारीवर शास्त्रशुद्ध पद्धतीने राग आळवणा-या कसलेल्या सतारवादकाच्या सफाईने प्रमाणबद्ध केली. आम्हा सर्व फुलांचा कोन तयार केला. कोनाच्या बाजुने मोरपंखी पाने लावली आणि एखादा राजा दरबाराच्या मध्यभागी जसा आपल्या सिंहासनावर विराजमान होतो त्याप्रमाणे त्या दुकानदाराने मला सर्व फुलांच्या मध्यभागी ठेवले. आपण तयार केलेल्या कोनाकडे त्या दुकानदाराने एक नजर टाकली. कोनावर चांदण्यांचे डिझाइन असलेल्या पारदर्शक प्लॅस्टिक पेपरचे आवरण चढवले. त्यावर निळ्या रेशमी कापडी टेपची छानशी गाठ मारली आणि आम्हा सर्व फुलांवर चमकीचा शिडकावा करून सुगंधीत पाण्याचा हलकासा फवारा मारला. आपल्या कलाकृतीकडे फुलवाल्या दुकानदाराने एक दृष्टी टाकत प्रसन्न चित्ताने तो पुष्पगुच्छ त्या व्यक्तिला दिला.
ती व्यक्ति तो पुष्पगुच्छ घेऊन एका नवविवाहित दांपत्याच्या स्वागत समारंभाला गेली. आपल्या प्रेमाचे, शुभेच्छाचे प्रतिक असलेला तो पुष्पगुच्छ त्या व्यक्तिने नवविवाहीत दांपत्याला दिला. त्यावेळी तो कलात्मक पुष्पगुच्छ, त्यातील गुलाब व सर्वांच्या मध्यभागी सौंदर्याने झळाळलेला मी, हे सर्व पाहून त्या नवपरिणीत वधु-वराला व इतरांना आनंद होणार, माझे एका फुलाचे जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार या विचारांने मी अगदी हारखुन गेलो होतो.
पण त्या नव्या जोडप्याने किंवा इतर कुणीही आमच्याकडे ढुंकुनही पाहिले नाही. ती सर्व मंडळी पुष्पगुच्छ बाजुला ठेवून फोटो-व्हिडीओ घेण्यात मग्न झाली. आम्हा सर्व फुलांचा हिरमोड झाला. आम्ही सर्वजण मनातून खट्टु झालो.
रात्र झाली. स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपला. आहेराची खोकी, पाकीटे घेऊन वधु, वर, इतर सर्वजण निघून गेले. स्टेजच्या एका कोप-यात आम्हा फुलांचा गुच्छ तसाच पडलेला होता.
थोड्या वेळाने हॉल सफाई करणारे लोक आले. त्यांनी हॉलमधला कचरा टोपल्यामध्ये एकत्र करतांना एका कच-याच्या टोपलीत आम्हा फुलांचा गुच्छही कोंबला आणि इतर कच-यासह इथे दगडामध्ये फेकुन दिला. आम्हा सर्वाचे अंग चांगलेच ठेचकाळून निघाले. कालची पूर्ण रात्र अंधारात, या दगडात मनातल्या मनात कुढत, दुःखी मनाने मी पडुन राहिलो.
सकाळ होताच मी आजुबाजुला पाहिले. पुष्पगुच्छ विस्कटुन त्यातील सर्व फुले उधळली गेली होती. इतस्ततः पडली होती. माझ्या बाजूला पडलेल्या गुलाबाच्या नाजुक फुलांना दगडात फेकल्याचा धाव सहन न झाल्याने कोमजून ती काळी पडली होती. त्यांचे आयुष्य संपले होते.
मला जाणवले की या गुलाबाच्या फुलांप्रमाणे माझे आयुष्यही आता थोड्या वेळाने संपणार आहे. इतरांना आनंद देण्याच्या ज्या उद्देशाने परमेश्वराने मला या पृथ्वीवर पाठविले होते. तो उद्देश, आणि माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आता कधीही पूर्ण होणार नव्हते. माझे जीवन व्यर्थ गेल्याच्या विचाराने मी अत्यंत दुःखी झालो होतो. पण परमेश्वरी इच्छा कांही वेगळी होती.
अचानकपणे तुम्ही मला पाहिलेत. माझ्याकडे पाहतांना मनाला आनंदीत करणारे कांही तरी तुम्हाला त्या क्षणी जाणवले. आनंदाचा तो क्षण, आपल्या जाणीवेत कायम राहावा, पुन्हा कधीतरी अनुभवता यावा, यासाठी तूम्ही माझा फोटो घेतला, कॅमेरात साठवलात.
जीवनाच्या या सरत्या क्षणी तरी कां होईना तुम्हाला, किमान एका व्यक्तिला तरी माझ्यामुळे आनंद मिळाला, ज्या उद्देशाने त्या अनंताने मला पृथ्वीवर पाठवले तो उद्देश आणि माझ्या जीवनाचे उद्धीष्ट पूर्ण झाले हे जाणून मला खुप आनंद झाला. माझ्या जीवनाचे सरते क्षण तूम्ही समाधानाचे, आनंदाचे केले याच्या कृतज्ञे पोटी मी तुमचे आभार मानले. थँक्यू सो मच. तुमचे मनापासून आभार.
आता माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे. कांही वेळाने या दगडातुन मी बाहेर निघेन. निळ्या आकाशाला पार करून आणखी उंच, वरती जिथे चंद्र, तारे चमकत असतात, ग्रह, सूर्यमाला वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर छटा पसरवत असतात, एक दिव्य शांतता, आनंदाने सर्व आसमंत भरून राहिलेला असतो तिथे मी पोहचेन आणि त्या दिव्य शांततेचा, आनंदाचा एक भाग होऊन राहीन.“ जरबे-याच्या फुलाने आपले बोलणे संपवले आणि पुढे कांही न बोलता ते गप्प बसले.
त्या फुलाच्या बोलणे ऐकताना एखाद्या मंत्राने भारावल्या सारखा मी भारावला गेलो होतो. फुलाने आपले बोलणे थांबवल्यावर मी भानावर आलो आणि त्याला म्हणालो,
“खुप छान बोलतोस तू. खुप आनंद झाला तू बोलत असताना. तुझे बोलणे परत-परत ऐकावे असे वाटते. शक्य असेल तर, आणखी कांही वेळ माझ्याशी बोलशील कां?”
जरब-याच्या फुलाला मी विनंती केली.
आणि पुन्हा एकदा ते जरबे-याचे फुल माझ्याशी बोलु लागले,
“फुलांच्या जीवनाबाबत मला सांगण्यासारखे जे-जे कांही होते ते मी तुम्हाला सांगितलेच आहे. आता खूप दिवसांपासून असलेली माझी एक इच्छा सांगतो. कांही माणसे फुले, जुन्या वस्तुंना निरूपयोगी समजतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना अडगळीत, रस्त्यावर कुठेतरी फेकून देतात. पण मला वाटते की कुणाही माणसाने वृद्ध, अपंग व्यक्तिंना निरूपयोगी, अडगळ समजून, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना कुठेतरी टाकून ...... “.
बोलता-बोलता अचानक ते जरबे-याचे फुल गप्प झाले. मी त्याच्याकडे निरखुन पाहिले. त्याच्या सुंदर पाकळ्या काळपट पडू लागल्या होत्या. काय झाले ते माझ्या लक्षात आले. दिव्य शांततेचा, आनंदाचा भाग होण्याच्या प्रवासाला ते फुल गेले होते. त्याच्या सहवासाची, बोलण्याची आठवण येऊन माझ्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झाले आणि कांही काव्यपंक्तितून गालावर ओघळले.
धन्य, धन्य हे फुला तूझे जीवन
आठवून त्याला मी करतो नमन
नाही गोठलेले, नाही थांबलेले
जरी असते छोटे नसते लांबलेले
आनंदी वाहते प्रवाही तुझे जीवन
जीवन हे फुलांचे येता माझ्या ध्यानी
भक्तिभावे दोन्ही कर जुळवुणी
करतो प्रार्थना मी प्रभु चरणी
कृपा करा द्यावा मला जन्म पुढचा
आनंद सर्वांना देणा-या एका फुलाचा
आनंद सर्वांना देणा-या एका फुलाचा, आनंद सर्वांना देणा-या एका फुलाचा ...
- आजचे बोल अंतरंगाचे इथे पूर्ण
१. कथेतील जरबे-याचे फुल. २. डचमन पाईप कॅक्टस फुल. ३. साकुरा फुले. ४. योझुकारा फोटो आणि ५. Link: wiki.nursarylive.com > Bramha Kamal…., m.youtube.com > watch Bramha Kamal ….. ब्रह्म कमळ