| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑगस्ट २०२४
सांगली, मिरज, कुपवाड शहर आणि परिसरातील तरुणांना नशा आणि जुगाराच्या आहारी नेणाऱ्या मोठ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्या विरोधात याआधीही पोलिसांना आम्ही अनेक पुरावे दिले असून कारवाईही झाली आहे. परंतु पुन्हा एकदा या अवैध धंद्याने देशाची भावी पिढी बरबाद करणारी पालेमुळे पसरायला सुरुवात झाली आहे. या नशा आणि जुगाराच्या विरोधात आम्ही आता सशक्त युवा क्रांती चळवळ उभी करीत असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पै. पृथ्वीराज पवार यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
या पत्रकात पै. पृथ्वीराज पवार यांनी म्हटले आहे की, तंबाखू मिळावी इतक्या सहजपणे सांगली मिरजेमध्ये गांजा मिळतो आहे, नशेच्या गोळ्या अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतात. अनेक होतकरू तरुण नशा आणि जुगाराच्या आहारी गेले आहेत. माझ्याकडे अनेक पालकांनी याबाबत तक्रार केली असून याबाबत आवाज उठवावा अशी मागणी केली आहे.
याबाबत मानसोपचार तज्ञांसह मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात गेल्यानंतर परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते. जुगारात तरुणांनी हजारो रुपये गमावलेले आहेत, त्यासाठी ते चोरीच्या, वाटमारीच्या वाममार्गाला लागले आहेत. चेन स्नॅचिंग व गंभीर गुन्हेगारी वाढण्याच्या मुळाशी नशा आणि जुगारच आहे. या विरोधात पोलिसांकडून आक्रमक कारवाईची अपेक्षा व्यक्त करून पै. पृथ्वीराज पवार यांनी या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, रोज गांजा पकडला जातो, रोज गांजा पकडला जातो, रोज जुगार मटका अड्ड्यावर कारवाई होते, रोज अल्पवयीन गुन्हेगार सापडतात, त्यांच्यावर कारवाईही होते. पण या घटना काही केल्या थांबत नाहीत. त्यामुळे आता या विरोधात योगींचा बुलडोझर पॅटर्नची गरज आहे.
पुण्यात व मुंबईत गुन्हेगार व अवैध धंद्यावर बुलडोझर चालवले गेले. आता सांगलीतही अशाच पद्धतीने बुलडोजर चालवून या पालेमुळे उकडून टाकली पाहिजेत. या चळवळीची सुरुवात आम्ही मंगळवारी पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देऊन करीत आहोत. 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी शहरात जागोजागी जागृती व सह्यांची मोहीम घेऊन, आम्ही पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांना जनतेच्या मनात असलेला या विषयाचा संताप पोहोचवू. त्यानंतर जर कारवाया झाल्या नाहीत, नशिबाजींचे अड्डे उध्वस्त झाले नाहीत, तर राजमाता अहिल्यादेवी जयंती दिनापासून हा आक्रमक पद्धतीने आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा पै. पृथ्वीराज पवार यांनी या निवेदनात दिला आहे.