Sangli Samachar

The Janshakti News

महानगरपालिकेकडून 'हर घर तिरंगा, घर घर तिरंगा' अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा, तर जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅली संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑगस्ट २०२४
सांगली महानगरपालिकेकडून 'हर घर तिरंगा घर घर तिरंगा' अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन तर जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅली संपन्न झाली. विश्रामबाग चौक येथून आयुक्त शुभम गुप्ता यांनी तिरंगा सायकल रॅलीला तर उपायुक्त वैभव साबळे यांनी महापालिकेच्या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखविला. या तिरंगा सायकल रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी , पोलीस अधीक्षक संदीप घुगे , महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून आयुक्त शुभम गुप्ता यांनी ध्वज दाखवत सायकल रॅलीला सुरुवात केली. त्यानंतर मार्केट यार्ड, पुष्कराज चौक, राम मंदिर, काँग्रेस भवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या तिरंगा सायकल रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसहित शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.


तर महापालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शहरातील धावपटू, शाळकरी विद्यार्थी, खेळाडू याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, आणि मॉर्निंग ग्रुप मिरज यांनी सहभाग घेतला होता. पुष्कराज चौक या ठिकाणी या तिरंगा मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला.

या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या तिरंगा मॅरॅथॉन स्पर्धेत दीपक सुर्यवंशी, बिरू कोळेकर, वैभव पवार या तीन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संभाजी काळेल , उद्धव पाटील, आशा फडणीस या नामवंत धावपटूंनाही सन्मानित करण्यात आले. रॉयल कृष्णा बोट क्लबचे आंतरराष्ट्रीय पंच दत्ता पाटील, भरत बर्गे विनोद नलावडे, हरीश पाटील, संजय निकम, अर्जुन पाटील, सौ. अर्चना पाटील, नितीन कदम, प्रसाद जामदार यानी विशेष सहभाग घेतला. 

स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रा शिंगाडे, शिरीन नईम शेख, अमृता उबाळे यानी काम पाहिले. शिक्षण मंडळ समन्वयक तात्यासाहेब सौदते आणि क्रीडाधिकारी अमजद जेलर यांनी संयोजन केले. स्पर्धेदरम्यान महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसिडर दीपक चव्हाण यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ.वैभव पाटील, पाणीपुरवठा अभियंता चिदानंद कुरणे, सुनील पाटील, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, जन्ममृत्यू निबंधक गिरीश पाठक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. आभार शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी मानले.