| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० ऑगस्ट २०२४
'राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेली युती तोडण्यास सर्वांच्याच भल्याचे आहे, तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचे लढू' असे आव्हान शिवसेना गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपला दिले होते. याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, 'युती तोडायचे असेल तर आमची देखील तयारी आहे.' यावरून महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिंदे आणि पवार गटात धुसफूस वाढली आहे. अशात शिंदे गटाचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघावर भाजपने हक्क सांगितला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त करीत म्हटले होते की, 'ठाणं पण आमचं, कोकणपण आमचं, जिथे युती आहे तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हीच लढणार असे लोकसभेला पाहिले. पण विधानसभेला हे आम्ही खपवून घेणार नाही. जिथे ज्यांची ताकद जादा, तिथे त्या पक्षाचा उमेदवार, असा निर्णय घेणार नसाल तर ही युती तुटलेली बरी.' असे रामदास कदम यांनी म्हटले होते.
याबाबत बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, रामदास कदम यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणे अपरिपक्वपणा आहे. वास्तविक हा विषय शिंदे-फडणवीस यांच्यासोबत बसून सोडवता आला असता. रवींद्र चव्हाण यांच्या बद्दलही तुम्ही जाहीर नाराजी व्यक्त केली. याबाबत फडणवीस यांच्याकडे तक्रार करायला हवी होती. अशा पद्धतीने जाहीर वाच्छता करून आपण कार्यकर्ता व जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहोत.
महायुतीतील सर्वच कार्यकर्त्यांची भावना एकमेकांनी समजावून घ्यायला हवी. महायुतीचा धर्म सर्वांनीच पाळायला हवा. युतीची गरज सर्वांनाच आहे त्यामुळे चांगल्या वातावरणात अशा महत्त्वाच्या नेत्यांनी मिठाचा खडा टाकू नये. उणीदुणी काढायची तर आमच्याकडेही भरपूर मालमसाला आहे. पण यामुळे कुणाचेच भले होणार नाही. युतीची गरज फक्त भाजपलाच आहे असं रामदास कदम यांना वाटत असेल तर त्यांचा तो गोड गैरसमज आहे. आमचे कार्यकर्ते संयम बाळगून आहे, परंतु शिंदे गटातून नाराजी व्यक्त होणे थांबायला हवे.
रामदास कदम यांच्या मनातील खदखद त्यांच्या मुलाला आमदार व्हायचे आहे. त्यांना मंत्री करावी अशीही कदम यांची इच्छा होती. परंतु हे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर रामदास कदम यांनी वैफल्यग्रस्तातून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार 'लांडगा आला रे आला' करण्याची आवश्यकता नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या संयमाला दुबळेपणा समजू नका. भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे. शिंदे गटाची ताकद किती मतदारसंघात आहे हे त्यांनी ओळखावे असेही दरेकर यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटातही भाजपच्या जागा वाटपातील वर्चस्वाबाबत, आणि अजित पवार यांना भाजपाकडून टार्गेट करीत असल्याबद्दल यापूर्वी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील 'सख्य' नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रसंगाने उभ्या महाराष्ट्राला पहावयास मिळाले. यातून महायुती मधील अंतर्गत धुसफूस वाढली तर ते महायुतीच्या एकसंघतेला तडा जाण्यास कारणीभूत ठरणार आहे. यासाठी महायुतीतील प्रत्येकानेच आपली जबाबदारी ओळखून वागावे अशा कानपिचक्या भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने शिंदे व पवार गटाच्या नेत्यांना दिल्याची ही चर्चा आहे.