| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑगस्ट २०२४
विनोबा भावेंच्या नंतर पदयात्रांचा सामूहिक कृती कार्यक्रम राबवणारे लोक नेते म्हणून राजारामबापू पाटील यांचे नाव दीर्घकाळ स्मरणात राहील. स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधींनी पद यात्रेचा मंत्र दिला. विनोबा भावेंनी भूदान, ग्राम दानासाठी पद यात्रा काढल्या. साने गुरुजींच्या सुचनेनंतर खादी वापरायला सुरुवात केलेल्या राजाराम बापूंनी 1958 ला 7 ते 19 एप्रिल असे बारा दिवस विनोबा भावेंच्या पद यात्रेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांपर्यंत जावे हे सूत्र बापूंनी स्वीकारले . 1975 च्या मार्च महिन्यात बापूंनी वाळवा तालुक्यातील 57 गावात 650 कि. मी. अंतराची पदयात्रा काढली.
इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या वीस कलमी कार्यक्रमाचा प्रचार साडेतीन महिने केला. ग्रामीण जनतेशी संवाद साधला. इंदिरा गांधींनी बापूंचे अभिनंदन केले. 7 ते 23 डिसेंबर 1980 या काळातील नागपूरची शेतकरी दिंडी राज्यभर गाजली. जळगाव ते नागपूर हे 465 कि. मी. चे अंतर पूर्ण करताना बापूना वर्धा येथे अटक करण्यात आली. या शेतकरी दिंडीमुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल राज्यभर वातावरण निर्मिती झाली. 2 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 1982 या कालावधीत दुष्काळी जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी सांगली ते उमदी ही 250 कि. मी. अंतराची पदयात्रा 10 दिवस चालली. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली 1983 ला महाराष्ट्र ते मध्यप्रदेश अशी दीर्घ अंतराची व काळाची पदयात्रा निघाली होती. या पदयात्रेत बापूंनी कागल ते धुळे या अंतरात 1 एप्रिल ते 11 मे असा सव्वा महिना पायी प्रवास केला.
बापूंसाठी पदयात्रा हे जनसंवादाचे प्रमुख साधन होते. बापू सहभागी झालेल्या या पाच पदयात्रा म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची आत्मीयता यात्राच होती. लोकांच्या अडी अडचणी समजून घेणे व लोकांनी आपली भुमिका सांगणे यासाठी बापूंनी पदयात्रेचे माध्यम निवडले बापू लोक पंढरीचे वारकरी बनून लोकांत मिसळत आणि चालत राहिले. पद यात्रांमुळे बापूंसाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार झाले. बापूंच्या नंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील व त्यांच्या समर्थकांनी कासेगांव येथे ' पदयात्री ' हे स्मारक उभारले. पद यात्रांच्या जोडीला कार्यकर्त्यांसाठी सतत अभ्यास शिबीरे घेणे हे बापूंच्या नेतृत्वाचे वैशिष्टय. आपल्या विधायक कार्यकर्तृत्वाला बापूंनी लेखनाची देखील जोड दिली. त्यांनी काही काळ 'विवेक न्यूज' हे साप्ताहिक चालवले. लोकशाहीची क्षितिजे' आणि 'आधुनिक जपान' ही पुस्तके लिहली. विधायक वृत्तीच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि तालुक्यातील संस्थात्मक लोकजीवनाचे पथदर्शी काम ही बापूंची ओळख.
डॉक्टर संजय थोरात,
इस्लामपूर.